जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती
प्रतिनिधी रत्नागिरी
राजापुरातील बारसु येथे शुक्रवारी पोलीस व आंदोलक यांच्यामध्ये झालेली झडप सुनियोजितरित्या करण्यात आली होती. जाणीवपूर्वक आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. अखेर उग्र झालेल्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना 6 पोलीस जखमी झाले. यामध्ये महिला पोलीस उपअधीक्षकाचा देखील समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारसु येथे शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांवर मोठा लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून अशा कोणत्याही प्रकारे लाठी चार्ज करण्यात आलेला नाही. केवळ बचावासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होता. आंदोलकांकडून आंदोलनाला हिंसक स्वरूप देण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्यात येत होत्या. मात्र पोलिसांकडून हे सर्व प्रकार यशस्वी होऊ दिले गेले नाहीत., शुक्रवारी पोलिसांशी झालेल्या झडपेनंतर दोन दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 164 महिला व 77 पुरूषांना ताब्यात घेऊन जामीनावर सोडून देण्यात आले. महिलांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जेवण, नाश्ता, पाणी चहा आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महिलांना त्यांच्या घरी सुखरूप रित्या सोडून देण्यात आले, असे कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित झाले असले तरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील काळात जिल्हाधिकारी व आपण स्वत: गावांमध्ये जाऊन लोकांचे प्रबोधन करणार आहोत. तसेच त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी पयत्न केले जातील. समाज माध्यमांवर काही प्रमाणात अफवा पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रकारे गैरपकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.








