खिडकी तोडून चोरट्यांनी केला बँकेत प्रवेश
चिपळूण प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बँकेच्या मागील खिडकीचे ग्रील तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आला. घटनास्थळी सावर्डे पोलिसांनी जाऊन पाहणी केली. दरम्यान, सावर्डेसह चिपळूण शहरात झालेल्या चोऱ्यामुळे पुन्हा चोरीसत्र सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सावर्डे बाजारपेठेतच बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. असे असतानाच गुरुवारी रात्री बँक फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकेच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची काच फोडून व लोखंडी ग्रील काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. बँकेतील वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. कर्मचारी सकाळी बँकेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले होते. मात्र काहीही चोरीस न गेल्याने सावर्डे पोलीस स्थानकात चोरी प्रकरणाची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पुढे येत आहे.