मानाचा लोहपुरुष किताब पटकावला
रत्नागिरी प्रतिनिधी
कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या लोहपुरुष ट्रायथेलॉन व ड्युएथेलॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने चमकदार कामगिरी करत लोहपुरुष हा मानाचा किताब पटकावला. रत्नागिरीच्या ट्रायथेलिट क्लबच्या एकूण १० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यातील चौघा जणांच्या सघांने मानाचा लोहपुरुष हा किताब पटकावला आहे. या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. ड्युएथेलॉन स्पर्धेत दोन खेळ, सायकलिंग आणि धावणे तर ट्रायथेलॉनमध्ये पोहणे, सायकलिंग व धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश असतो. लोहपुरुष (हाफ आयर्नमन) प्रकारच्या ट्रायथेलॉन स्पर्धेमध्ये १. ९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकल चालवणे आणि २१. १ किलोमीटर धावणे हे सर्व खेळ १० तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. हे अत्यंत कठीण आव्हान रत्नागिरी ट्रायथेलिट क्लबच्या अमित कवितके, ऍड. यतिन धुरत, विनायक पावसकर, अहमदअली शेख यांनी ही स्पर्धा १० तासाच्या निर्धारीत वेळेत पूर्ण करून यश मिळवले आहे.








