तीन जिवंत काडतुसे, एक गावठी बनावटीची बंदुक, सर्चलाईट जप्त
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड येथे विनापरवाना जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी वॅगनारमधून फिरत असताना पाचजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तीन जिवंत काडतुसे, एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल 12 बोअरची बंदुक, एक सर्चलाईट आढळून आली.
या बाबतची फिर्याद शिवम अंबुलकर यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गाडीतील महेश महाजन (42, केळवद), सुहास रांगले (48, तुळशी), गजानन तांबुटकर (48 पालघर), अभय पिचुर्ले (38, तुळशा), अजय कदम (27 शिरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या बाबत मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 12.30 च्या सुमारास मंडणगड-बाणकोट रोडवर पाचरळ फाटा येथे बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, सहकारी शिवम आंबुलकर व चालक दैवत राणे यांना गस्त घालताना मारुती वॅगनार गाडी (एम.एच.08-ए जी 2804) आढळली. गाडीत तपासणी केली असता तीन जिवंत काडतुसे, एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल 12 बोअरची बंदुक, एक सर्चलाईट आढळून आली. यामुळे पोलिसांनी गाडीतील महेश महाजन, सुहास रांगले, गजानन तांबुटकर, अभय पिचुर्ले, अजय कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संदीप गुजर करत आहेत.









