वार्ताहर/मौजे दापोली
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दापोली तालुक्यातील कर्देत पर्यटनाला आलेल्या पर्यटकांपैकी एक समुद्रात बेपत्ता झाला आहे. सौरभ धाडवे ( 18 ) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत समुद्रात बुडणाऱ्या त्याच्या 5 मित्रांना स्थानिकांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. सौरभचा समुद्रामध्ये शोध घेण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोजागिरी निमित्त दापोली तालुक्यात सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कार्तिक घाडगे (20), यश घाडगे (19), दिनेश चव्हाण (20), अक्षय शेलार (19), कुणाल घाडगे (30) सर्व राहणार एकसर तालुका वाई, जि. सातारा, सौरभ धावडे (18) राहणार पाचगणी, महाबळेश्वर असे सहा पर्यटक कर्दे येथे दुचाकी घेऊन आले होते. त्यांनी रविवारी दुपारी 12 सुमारास किनाऱ्याला टेंट उभारला व आपले साहित्य ठेवले आणि ते सहाही जण पोहण्यासाठी समुद्रात गेले. त्यावेळी समुद्रला ओहोटी सुरू झाली होती. त्यामुळे पायाखालची वाळू निसटली आणि ते समुद्रत जाऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी समोरच हॉटेल मध्ये असलेले ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी आवाज ऐकला आणि दोरी घेऊन धावत गेले. त्यांनी दोरी समुद्रात फेकली आणि त्याना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच वेळी सरपंच सचिन तोडणकर यांनी लाईफ जॅकेट आणले. दोरीच्या साहाय्याने बुडणाऱ्यांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सौरभ धाडवे याचा हात सुटला आणि तो समुद्रत ओढला गेला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.
हे ही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, हर्णेचे बिट अंमलदार दीपक गोरे, कॉन्स्टेबल हिते आदी पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी , पोलीस पाटील सोनल खामकर हे घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती घेतली. या समुद्रात बुडालेल्या युवकाचा शोध पोलीस घेत आहेत.