टाळसुरे वार्ताहर
दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी दुपारी मॅक्झिमो व ट्रेलर यांच्या झालेल्या भीषण अपघातात 5 ठार तर 10 जखमी झाले आहेत. या अपघातामुळे दापोली व हर्णे पंचक्रोशी वर शोककळा पसरली आहे या अपघाताची भीषणता एवढी गंभीर होती की घटनास्थळी रक्त मासाचा खच पडला होता.
दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावरील आसूद जोशी बागे जवळ रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पर जिह्यातून आणलेले बांधकाम साहित्य रिकामे करून आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी मॅक्झिमो चालक अनिल उर्प बॉबी सारंग – 46 हे आपली मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या गाडीत 14 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दोन्ही गाड्या जोशी बागेवर व अवघड वाहनावर आल्या असतात मोठ्या ट्रेलरने वळणात बाहेरून वळण घेतले. यामुळे मॅक्झिमो गाडीला पुढे जाण्याकरिता रस्ताच राहिला नाही. यामुळे मॅक्झिमो चालकाने गाडी बाजूला साईट पट्टीवर घेतली तरी मोठ्या ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये मॅक्झिमो चालक अनिल सारंग यांच्यासह मरियम काझी – 6 रा. अडखळ, स्वरा कदम- 8 रा. अडखळ, संदेश कदम -55 रा. अडखळ, फराह काझी – 27 रा. अडखळ हे या अपघातात मृत झाले.
तर विनायक चौगुले -45 रा. पाजपंढरी, श्रद्धा कदम – 14 रा. अडखळ, मीरा बोरकर- 22 रा. पाडले, सपना कदम -34 रा. अडखळ, भूमी सावंत – 17 रा. हर्णे, मुग्धा सावंत – 14 रा. हर्णे, वंदना चौगले – 38 रा. पाजपंढरी, क्रांती चौगले – 9 रा. पाजपंढरी विनोद चौगुले – 38 रा. पाजपंढरी हे जबर जखमी झाले.
या अपघाताचे वृत्त कळताच हर्णे पंचक्रोशीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर अपघात घडतात ट्रेलरच्या चालकाने ट्रेलर तेथेच टाकून जंगलामध्ये पळ काढला. या सर्वांना श्री मानाचा गणपती व अन्य रुग्णवाहिकांच्या साहाय्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी मदत करणायांची मोठी गर्दी झाली होती. यातील सर्वात जास्त गंभीर असणाया महिलेला तात्काळ डेरवण येथे हलवण्यात आले. यावेळी परिस्थिती एवढी भीषण होती की अनेकांचे नाव देखील कळणे कठीण झाले होते. अखेर गंभीर जखमींना डेरवण, मुंबई व भागवत हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
या अपघातानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींचे नातेवाईक यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या अपघातात संदेश कदम व स्वरा कदम या बापलेकीचा दुर्दैवी मृत्य झाला. तर संदेश कदम यांची पत्नी सपना कदम व दुसरी मुलगी श्रद्धा कदम या अपघात गंभीर जबर जखमी झाल्या आहेत. यामुळे अडखळ बौद्ध वाडीवर शोककळा पसरली आहे
श्री मानाचा गणपती, साई देसाई, साहिल पवार, मनीष बुरटे, अब्बास मुल्ला, कैलास क्षीरसागर संदीप देसाई, किशोर देसाई, केदार साठे, श्रीराम इदाते, सचिन गायकवाड जहुर कोंडविलकर, शफी मेमन यांच्यासह अनेकांनी जखमींना व मृतांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी अतोनात मेहनत घेतली








