राजस्थानच्या कोटा येथे विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याच्या नव्या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटणे अपरिहार्य आहे. समाजातील आत्महत्या हाच मुळी चिंतेचा विषय. त्यातही कोटा येथील विशेष मार्गदर्शन वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या हा मुद्दा व्यापक चर्चेचा मुद्दा ठरतो. कारण नजिकच्या भूतकाळात अशा काही घटना घडल्या आहेत व कोटा येथे इंजिनिअरिंग स्पर्धा प्रवेश परिक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी कोटा येथे मुक्कामी राहून मोठ्या रकमांसह खर्च करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येत व देशाच्या विविध भागातून दरवर्षी येत असतात. विद्यार्थ्यांच्या या संख्येत व त्यांच्यात प्रसंगी निर्माण होणारे नैराश्य व त्यापोटी टोकाचा उपाय म्हणून थेट आत्महत्येचा मार्ग स्विकारणे हा प्रकार चिंतनीय व निंदनीय पण ठरतोच मात्र आपल्या मुलांना अट्टाहासाने विशेष प्रशिक्षण देणाऱ्या पालकांनी पण यातून निश्चितपणे काही शिकण्यासारखे आहे.
या नव्या प्रकरणाची पारंपारिक पार्श्वभूमी म्हणजे देशपातळीवर इंजिनिअरिंग, मेडिकल यासारख्या प्रमुख व निवडक परिक्षांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षांमध्ये दरवर्षी वाढीव संख्येत विद्यार्थी नसतात. स्पर्धा परिक्षेत त्यांनी यशस्वी व्हावे यासाठी विद्यार्थी व त्याहीपेक्षा त्यांचे पालक अधिक उत्सुक आणि प्रयत्नशील असतात. याच पूर्वतयारीचे मार्गदर्शन केंद्र म्हणून गेल्या सुमारे 20 वर्षात कोटाने मोठे नाव कमावले आहे. फार मोठ्या संख्येत कोटा येथे इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा तयारीची मार्गदर्शन केंद्र प्रस्थापित व कार्यरत असून प्रचंड संख्येने विद्यार्थी या केंद्रामध्ये येत आहेत. विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुद्धा प्रवेश चाचणी घेतली जाते व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणी केली जाते. त्याशिवाय देशाच्या विविध प्रांतांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सततचा व मोठा ओघ, त्यांची त्यांच्या गरजांनुरुप निवास-योजना व्यवस्था, खानपान, कपडे धुलाई इ. वर आज कोटा शहराची समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. एवढे सांगितले म्हणजे इंजिनिअर प्रवेश पात्रता परिक्षेच्या मार्गदर्शन व्यवसायाचा शहराच्या जनजीवनावरच झालेला मोठा परिणाम स्पष्ट होतो.
कोटा येथील इंजिनिअरिंग प्रवेश पात्रता परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमधील प्रवेश व शिक्षण शुल्क आणि त्याचबरोबर तेथील खर्चीक राहणीमान इ. मुळे कोटा येथे इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी आता पालकांना मोठा खर्च करावा लागतो. अधिकांश मुलांच्या पालकांना तर हा वाढीव खर्च झेपणारा नसतो व त्याची जाणीव त्यांच्या मुलांना असते. मात्र कोटाच्या प्रवेशद्वारातून व इंजिनिअरिंग प्रवेश पात्रता परिक्षेच्या यशाद्वारे आपल्या मुलाला या क्षेत्रातील चांगला अभ्यासक्रम व उत्तम संख्येत अभियांत्रिकी पदवी करता याचा ध्यास व अट्टाहास संबंधित पालकांनी घेतलेला असतो. या विषयाचे सततचे दडपण विद्यार्थ्यांवर सुद्धा तेवढेच असते. त्यामुळे व याच दडपणाच्या परिणामी कोटा येथे महागडे व न परवडणारे असे मार्गदर्शन घेऊन पण प्रत्यक्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात अपेक्षित यश न मिळाल्यास अथवा अपयश आल्यास हे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात, असे अनुभव वारंवार येतात.
तसे पाहता विद्यार्थीदशेत व विशेषत: विशेष व खर्चीक मार्गदर्शनासह आपल्या भविष्यातील करिअरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयत्नांनी पण अपयश आल्यास त्यांचे खचून जाणे, नैराश्य येणे व त्यापोटी प्रसंगी आत्महत्येसारखा मार्ग चोखाळणे या बाबी आता केवळ कोटाच नव्हे या आणि अशा विविध शहरांमध्ये दिसून येतात.
यासंदर्भात थोडक्यात पण आकडेवारीसह सांगायचे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी अहवालातील तपशिलानुसार 2019 मध्ये देशात आत्महत्येमुळे झालेल्या मृत्यू संख्येत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची टक्केवारी 6.4 टक्के होती. याच संख्येच्या 2020 मधील अहवालानुसार त्यावर्षी देशात 12,500 तरुणांनी आत्महत्या केली. याचाच अर्थ देश पातळीवर 2020 मध्ये दररोज सुमारे 34 युवकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. ही बाब आणि आकडेवारी अर्थातच भयावह आहे.
या पार्श्वभूमीवर कोटा येथील विद्यार्थ्यांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे शहरात दरवर्षी सुमारे 2 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग पदवी प्रवेश अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन घेण्यासाठी दाखल होतात. यावर्षी सुमारे 2 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग पदवी प्रवेश अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन घेण्यासाठी दाखल होतात. यावर्षी म्हणजेच 2023 च्या
ऑगस्ट अखेरपर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली व यापैकी 6 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या तर केवळ ऑगस्ट 2023 मध्येच घडल्या. ही स्थिती व आकडेवारी विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक-शिक्षक, समाज, धोरणात्मक निर्णय घेणारे या साऱ्यांसाठी धक्का देणारीच नव्हे तर या प्रत्येक घटकाला अंतर्मुख करणारी ठरली. मात्र त्यावर परिणामकारक तोडगा काढायचा झाल्यास विषयाशी संबंधित सर्व आणि प्रत्येक समाज घटकाने आपापल्या परीने गांभीर्याने विचार करुन त्यानुसार खालीलप्रकारे कृती करणे पण तेवढेच गरजेचे ठरते.
विद्यार्थ्यांचे पालक : विशिष्ट उद्देश व आक्रस्त्रळी ध्यासापोटी आपल्या मुलांना अट्टाहासाने कोटा वा तत्सम ठिकाणी अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी पाठविणाऱ्या पालकांनी हे मनोमन लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, त्यांनी आपल्या इच्छापूर्तीसाठी मुलांना पाठवू नये. पालकांच्या अपेक्षांचे हे अवाजवी व अवास्तव ओझे विद्यार्थी एका मर्यादेबाहेर वाहू शकत नाहीत व त्यातूनच अनर्थ घडू शकतो हा अनुभव वारंवार येतो.
शिक्षक – प्रशिक्षक : ‘कोटा पॅटर्न’च्या विशेष प्रशिक्षणामध्ये शिक्षक-प्रशिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. या प्रशिक्षकांच्या विशेष नैपुण्यापोटीच विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनासाठी घरदार सोडून प्रसंगी हजारो किलोमीटर दूरवर आलेले असतात. त्यामुळे एक विषयतज्ञ म्हणून या विद्यार्थ्यांना शिक्षण देतानाच त्यांना समजेल असे समजावून सांगणे या शिक्षकांसाठी महत्त्वाचे ठरते. कोटा येथे येणारे विद्यार्थी त्यांच्या पात्रता परिक्षेत अव्वल गुण घेणारे असतात हे लक्षात घेतले तर त्यांच्या प्रशिक्षणातील शिक्षकांची जबाबदारी सहज स्पष्ट होते.
व्यवस्थापन कंपन्या : बरेच विद्यार्थी प्रशिक्षणाच्या दरम्यानच पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरी-रोजगाराच्या संदर्भात कंपनी-व्यवस्थापनांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी काय-काय अवाजवी व अवास्तव अपेक्षा असतात याच्या कपोलकस्थित कथा-चर्चेमुळेच हतबल होतात, प्रसंगी नैराश्यावस्थेत जातात. वास्तविक पाहता अभ्यासक्रमाच्या प्रवेशापूर्वीच रोजगाराचा अतिरेकी चिंता विद्यार्थ्यांनी करु नये. त्याचवेळी कंपन्यांनीसुद्धा स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कोटाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन वा ‘ऑनलाईन’ पद्धतीने छोट्या-छोट्या सत्रांद्वारे त्यांना वस्तुस्थिती समजावून शंकानिरसन केल्यास मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्येची सोडवणूक त्यांच्याकडून होऊ शकेल.
विद्यार्थी व सामाजिक संस्था : या साऱ्या घटनाक्रम प्रक्रियेमध्ये कोटा सारख्या ठिकाणी दूरवरुन आलेल्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा व तेवढाच दुर्लक्षित मुद्दा म्हणजे त्यांना भासणारे एकाकीपण. घरापासून दूर असणाऱ्या व वेगवेगळ्या कारणांनी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे तणावग्रस्त असणाऱ्या या विद्यार्थ्यांना विशेषत: त्या-त्या ठिकाणच्या सामाजिक संस्थांनी सामाजिक जबाबदारीचे भान समजून सण-वार प्रसंग वा राष्ट्रीय – सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले तर या विद्यार्थ्यांचे एकटेपण, नैराश्य कमी होईल व त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम होतील. ‘कोटा’ प्रकरणी टोकाची भूमिका घेण्यापासून विद्यार्थी पण परावृत्त होतील.
– दत्तात्रय आंबुलकर








