मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ द्यावेत, रेशन दुकानदारांचे कमिशन प्रति क्विंटल 224 रुपयांवरून 250 रुपये करावे, मासिक कमिशन सुरळीत द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवार दि. 7 रोजी रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे. रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे मंगळवारी दंडाला काळी फीत बांधून आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर काही रेशन दुकानदार काळी फीत बांधून दुकान उघडणार आहेत. येत्या 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. महाराष्ट्र, गोवा राज्याप्रमाणे कर्नाटक राज्यातदेखील वाढीव कमिशन लागू करावे, अशी मागणी जोर धरण्यात आली आहे. अन्यथा गोदामातून धान्यसाठा न उचलण्याचा इशारादेखील संघटनेने दिला आहे.
राज्यात रेशन दुकानदार मालक संघटनेने धान्यसाठा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा रेशन दुकानदारांनीही याला पाठिंबा दिला आहे. शिवाय मंगळवारपासून धान्यसाठा न उचलण्याचा निर्धार केला आहे. असे असले तरी काही रेशन दुकानदारांनी नोव्हेंबर महिन्यातील धान्याच्या साठ्याची उचल केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांनी अद्याप धान्यसाठा उचलला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत रेशन उचलले जाणार नाही, अशी माहितीही रेशन दुकानदार मालक संघटनेने दिली. सद्यपरिस्थितीत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ वितरित केले जात आहेत. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र, पुरेसा धान्यसाठा नसल्याने लाभार्थ्यांना धान्याऐवजी प्रति व्यक्ती 170 रु. दिले जात आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांचे कमिशन बुडाले आहे. दरम्यान, सरकारने ऑक्टोबरपासून 10 किलो तांदूळ वितरित करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप 10 किलो तांदूळ दिले जात नाहीत. त्यामुळे दुकानदारांना वाढीव कमिशनपासून दूर राहावे लागत आहे.
कमिशन सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन
वाढीव कमिशनसाठी येत्या मंगळवारी राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे. याला बेळगाव जिल्ह्यातदेखील पाठिंबा दिला जाणार आहे. रेशन कार्डधारकांना राज्य सरकारने 10 किलो धान्याचा पुरवठा करावा. शिवाय कमिशन सुरळीत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.
– राजशेखर तळवार (राज्य उपाध्यक्ष, कर्नाटक राज्य रेशन दुकान मालक संघटना)









