अन्न-नागरी पुरवठा खात्याकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा : बारा रेशन दुकानदार गुंतले नोंदणीकृत रेशनकार्ड वितरण कामात
बेळगाव : ई-श्रम नोंदणीकृत कामगारांच्या रेशनकार्ड वितरणासाठी रेशन दुकानदारांना कामाला लावले आहे. अन्न, नागरीपुरवठा खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने बारा रेशन दुकानदार ई-श्रम नोंदणीकृत रेशनकार्ड प्रक्रिया कामासाठी लागले आहेत. ई-श्रम नोंदणीकृत कामगारांसाठी रेशनकार्ड अर्ज व वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ई-श्रम नोंदणीकृत असलेले लाभार्थी खात्याकडे येऊ लागले आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांची सर्व माहिती घेण्यासाठी व इतर कामांसाठी दुकानदारांना खात्याचे काम करावे लागले आहे. अन्न व नागरीपुरवठा खात्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अशा स्थितीत दुकानदारांकडून ई-श्रम नोंदणीकृत रेशन वितरणाचे काम केले जात आहे.
अर्ज प्रक्रिया, रेशन वितरण प्रक्रिया सुरू
अन्न व नागरीपुरवठा खात्याकडून ई-श्रम नोंदणीकृत कामगारांच्या रेशन वितरणाला प्राधान्य दिले आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया आणि रेशन वितरण प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची धडपड सुरू आहे. कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांची मदत घेतली आहे. बारा रेशन दुकानदार ई-श्रम नोंदणीकृत रेशनकार्ड वितरणाच्या कामात गुंतले आहेत.
85 हजारहून अधिक अर्ज
सद्यस्थितीत ई-श्रम नोंदणीकृत कामगारांना रेशनकार्ड वितरण केले जात असले तरी इतर सर्वसामान्यांसाठी रेशनसाठी अर्ज प्रक्रिया व वितरणही पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व तळागाळातील नागरिकांचे रेशनकार्ड वितरणाकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात 85 हजारहून अधिक नागरिकांनी रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, सर्वच कामे स्थगित झाल्याने अर्जदारांना केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अद्याप रेशनकार्डसाठी अर्ज आणि वितरण प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे.









