जुलैमध्ये करणार सुरळीत धान्य वितरण, रोख रकमेला विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
अन्नभाग्य योजनेंतर्गत जुलैपासून लाभार्थ्यांना धान्याऐवजी प्रतिकिलो 34 रुपये प्रमाणे माणसी 170 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांनी याला विरोध करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, शासनाने केवळ तात्पुरती एक महिन्याकरिता रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर पूर्ववत धान्य वितरण केले जाणार आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना दिलासा मिळाला असून दुकानदारांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी रेशन वितरक विकास संघाने दिली आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारकडे धान्य उपलब्ध नसल्याने तांदूळ वितरणात अडचणी येऊ लागल्या आहेत. केंद्र सरकारनेदेखील तांदूळ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला रेशन दुकानदारांनी विरोध करत या नियमात बदल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, शासनाने केवळ एक महिन्यापुरती रोख रक्कम दिली जाईल आणि त्यानंतर पूर्ववत दहा किलो धान्य वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी आंदोलन मागे घेतले आहे.
राज्यात अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांची संख्या अधिक आहे. या सर्व लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळू लागला आहे. शिवाय नव्याने बीपीएलसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे राज्याला धान्यसाठादेखील मोठ्या प्रमाणात लागतो. तेवढा धान्यसाठा शिल्लक नसल्याने सध्या तजवीज केली जात आहे. ऑगस्टपासून अतिरिक्त धान्यसाठा वितरित केला जाणार आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी तात्पुरते आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय सर्व रेशनदुकानदारांनी जुलै महिन्यातील धान्याची उचल करून वितरण करावे, असे आवाहनही कर्नाटक राज्य सहकारी रेशन वितरक विकास संघाने केले आहे.









