अन्न-नागरी पुरवठा खात्याचे स्पष्टीकरण, लाभार्थ्यांमध्ये गैरसमज नको
बेळगाव : दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांना मासिक रेशनच्या तांदळाचे वितरण केले जाते. मात्र, अलीकडे या तांदळामध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर काहींमध्ये या तांदळाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधला असता रेशनच्या तांदळात आवश्यक पोषकता नसल्यामुळे कुपोषण दूर करण्यासाठी फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ मिसळण्यात येतो. लाभार्थ्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण खात्याने दिले आहे. शासनाकडून गोरगरिबांना मासिक रेशनचा पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत एका व्यक्तीला 5 किलो तांदूळ दिला जात आहे. मात्र, या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांतून वाढल्या आहेत. मात्र, पौष्टिकता वाढविण्यासाठी यामध्ये हा फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ क्विंटलमागे एक किलो मिश्रित केला जात आहे. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. कोरोनाकाळात माणसी 10 किलो तांदळाचा पुरवठा केला जात होता. त्यानंतर आता माणसी 5 किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 170 रुपये वितरित केले जात आहेत. मात्र, तांदळामध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ मिळत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. तर काही लाभार्थी हा तांदूळ शिजविल्यानंतर चिकट पदार्थ बाहेर येत असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे हा तांदूळ खाण्याबाबत भीती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, हा तांदूळ पौष्टिकच असून कोणताही गैरसमज न बाळगता आहारात त्याचा वापर करण्याचे आवाहन खात्याने केले आहे.
फोर्टिफाईड तांदळाने आरोग्याला कोणताही धोका नाही
रेशनमध्ये दिल्या जाणाऱ्या तांदळात फोर्टिफाईड अर्थात पौष्टिक तांदूळ मिक्स केला जात आहे. पौष्टिकता लक्षात घेऊन हे केले जात आहे. याबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये. एक क्विंटलमध्ये एक किलो हा फोर्टिफाईड तांदूळ मिसळला जातो. या तांदळाने आरोग्याला कोणताही धोका नाही. उलट पौष्टिकतेसाठी हा तांदूळ मिसळला जात आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खाते सहसंचालक)









