लाभार्थी ताटकळत : जिल्ह्यात दहा हजारहून अधिक बीपीएल रेशनकार्डे वितरित होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
नवीन बीपीएल रेशनकार्ड कामांना चालना मिळाली आहे. त्याबरोबरच नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या लाभार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका सहन करावा लागत आहे. सातत्याने ही तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे.
दारिद्र्या रेषेखालील गोरगरीब जनतेला अन्नभाग्य योजनेतून धान्याचा पुरवठा केला जातो. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून अतिरिक्त मोफत रेशन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वाढीव रेशनचा लाभ मिळत आहे. मात्र रेशनकार्डचे काम सातत्याने ठप्प होत असल्याने लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने नवीन रेशनकार्ड वितरणाला प्रारंभ केला आहे. त्याबरोबर नवीन रेशनकार्डसाठी लाभार्थी ऑनलाईन सेंटरवर जाऊन अर्ज दाखल करत आहेत. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी येत आहेत.
बोगस लाभार्थ्यांवर कारवाई
बेळगाव जिल्ह्यात दहा हजारहून अधिक बीपीएल रेशनकार्डे वितरित केली जाणार आहेत. विशेषत: मागील वर्षी ज्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, खोटी कागदपत्रे पुरवून बीपीएल रेशनकार्ड मिळविणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. अशांवर अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत कारवाई केली जात आहे. नवीन बीपीएल कार्डांचे वितरण सुरू झाले आहे. त्याबरोबर अर्जही घेतले जात आहेत. त्यामुळे लाभार्थी बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डसाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र तांत्रिक समस्यांमुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ऑनलाईन सेंटरच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.









