अन्न-नागरी पुरवठा खात्याचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
रेशन अंतर्गत वितरण होणाऱ्या तांदळाची विक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई झाली आहे. दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने अन्नभाग्य योजनेंतर्गत वितरण होणाऱ्या धान्याची खुल्या बाजारात विक्री केल्यास संबंधित कुटुंबाचे रेशनकार्ड 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
अन्न-नागरी पुरवठा खात्याने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. रेशन धान्याच्या बेकायदा विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. पैशांसाठी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करणाऱ्यांचे कार्ड सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. शिवाय बाजारपेठ दराने तांदळाची रक्कम दंड स्वरुपात वसूल केली जाईल, असा इशारा खात्याने दिला आहे.
राज्यात गॅरंटी योजनांची घोषणा झाल्यानंतर बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी रेशनकार्डांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते. विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यामुळे नवी रेशनकार्डे वितरणाचे आणि अर्ज स्वीकृती स्थगित करण्यात आली होती. यापूर्वी अर्ज केलेल्यांना लवकरच कार्ड वितरण करण्यात येतील. तसेच अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला जाईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले आहे.









