प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीमुळे रेशनकार्ड वितरणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे अर्जदार लाभार्थ्यांना पुन्हा रेशनकार्डसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आधीच रेशनकार्ड वितरणाच्या कामात सातत्याचा अभाव आहे. त्यातच आता निवडणुका लागू झाल्याने पुन्हा रेशनकार्ड वितरणाचे काम लांबणीवर पडले आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून अन्नभाग्य योजनेतून गोरगरीब जनतेला मोफत रेशनचा पुरवठा केला जातो. बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांना रेशन वितरण केले जाते. मागील काही वर्षांपासून रेशन पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही लाभार्थी या रेशनपासून वंचित आहेत. काहींनी रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, शासनाकडून दर महिन्याच्या ठरावीक तारखेलाच रेशनकार्ड वितरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्वांना रेशनकार्डे मिळेनाशी झाली आहेत. आता निवडणुका जाहीर झाल्याने रेशनकार्ड वितरणात व्यत्यय आला आहे.
खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून धनाढ्या कुटुंबीयांनी बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांवर खात्यामार्फत कारवाई केली जात आहे. गैरमार्गाने मिळविलेली ही रेशनकार्डे रद्द केली जात आहेत. रेशनधान्याचा लाभ घेण्यासाठी काहींनी अनधिकृत रेशनकार्डे मिळविली आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
अन्नभाग्य योजनेतून माणशी सहा किलो तांदळाचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाकाळात माणशी दहा किलो तांदूळ दिला जात होता. मात्र, जानेवारीपासून हा अतिरिक्त धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना केवळ सहा किलोवर समाधान मानावे लागत आहे.









