ग्रामवन, बेळगाव वन, बापूजी सेवा केंद्रांवर सुविधा उपलब्ध : आवड्याभरात होणार प्रारंभ
बेळगाव : अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड दुरुस्तीची धडपड सुरू झाली आहे. खात्याने दि. 12, 13 आणि 14 तारखेला दुरुस्तीसाठी मुदत दिली होती. मात्र ऑनलाईन यंत्रणेवर ताण वाढल्याने सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशनकार्ड दुरुस्तीपासून वंचित रहावे लागले आहे. मात्र आता अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीचे काम कायमस्वरुपी सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय हे काम केवळ ग्राम वन, बेळगाव वन आणि बापूजी सेवा केंद्रांवर चालणार आहे.
येत्या आठवड्याभरात ही सुविधा या केंद्रांवर सुरू केली जाणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीची समस्या मार्गी लागणार आहे. सरकारने शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मीसाठी रेशनकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने योजनांपासून दूर रहावे लागत आहे. यासाठी शासनाने रेशनकार्ड दुरुस्तीसाठी वेळ निश्चित केला होता. मात्र याकाळात सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाल्याने बहुतांशी रेशनकार्ड लाभार्थ्यांची दुरुस्ती रखडली आहे. शासनाने आता नवीन आदेश जारी केला आहे. येत्या आठवड्याभरात रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. मात्र इतर सायबर केंद्रांवर ही सुविधा दिली जाणार नाही. केवळ बेळगाव वन, ग्रामवन आणि बापूजी सेवा केंद्रांवर रेशनकार्ड दुरुस्तीचे काम चालणार आहे. ऑनलाईन यंत्रणेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. त्यामुळे सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत आहे. यासाठी खात्याने हा निर्णय घेतला आहे.
दुरुस्तीचे काम सुरळीत चालणार
रेशनकार्ड दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यापासून कायमस्वरुपी सुरू केले जाणार आहे. ही सुविधा केवळ ग्रामवन, बेळगाव वन आणि बापूजी सेवा पेंद्रांवर सुरू केली जाणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरळीत चालणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी, अन्न व नागरी पुरवठा खाते सहसंचालक









