तीन दिवस चालणार काम, ग्राम, कर्नाटक व बेळगाव वनमध्ये सेवा उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
रेशनकार्ड दुरुस्ती काम 8 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे. लाभार्थ्यांना रेशनकार्ड दुरुस्ती असल्याने अन्नभाग्य आणि इतर योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. मात्र आता जिल्ह्यात 8 ऑक्टाब्sारपासून तीन दिवस रेशनकार्ड दुरुस्तीचे काम चालणार आहे. केवळ ग्रामवन, कर्नाटक वन आणि बेळगाव वन मध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मागील महिन्यात रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना देण्यात आली होती. मात्र ऑनलाईन सेंटरवर अतिरिक्त ताण वाढल्याने सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीचे काम केवळ ग्रामवन, कर्नाटक वन आणि बेळगाव वनमध्ये सुरू केले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये नावात बदल, पत्यात बदल, जन्मतारीख, नाव कमी करणे आणि इतर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
अन्नभाग्य योजनेला जुलै महिन्यापासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड दुरुस्तीची मागणी वाढली आहे. मात्र दुरुस्तीसाठी ऑनलाईन सेंटरवर ताण वाढू लागला आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. सप्टेंबर महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र वाढत्या अतिरिक्त ताणामुळे ही मुदत पुढे ढकलण्यात आली होती.
अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त तांदळाऐवजी प्रतिव्यक्तीला 170 रुपये दिले जात आहेत. मात्र काही लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. रेशनकार्ड दुरुस्ती झाल्यानंतर या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीसाठी देखील लाभार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. सद्य परिस्थितीत केवळ ग्रामवन, कर्नाटक आणि बेळगाव वनमध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे नागरिकांचा ताण वाढणार आहे. यासाठी इतर ठिकाणी देखील दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होवू लागली आहे.
श्रीशैल कंकणवाडी- सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते
बेळगाव विभागात रेशनकार्ड दुरुस्तीचे काम 8, 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी चालणार आहे. रेशनकार्डमधील दुरुस्ती केली जाणार आहे. ही सुविधा ग्रामवन, कर्नाटकवन आणि बेळगाववनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व्हर डाऊनची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.









