बेळगाव वन-ग्राम वनमध्ये सुविधा : प्रक्रिया अविरत सुरू ठेवण्याची मागणी
बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून ठप्प असलेल्या रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन आणि ग्राम वन सेवा केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून नवीन रेशनकार्ड वितरण आणि दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक गोरगरिबांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागले होते. दरम्यान, शासनाने रेशनकार्ड वितरण आणि दुरुस्ती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरून होती. सद्यस्थितीत नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया बंद असली तरी दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे रेशनकार्डची मागणी वाढली आहे. मात्र, सरकारकडून नवीन रेशनकार्ड आणि दुरुस्तीचे काम ठप्प केले जात आहे. त्यामुळे अनेकांना शासकीय सुविधांपासूनही दूर रहावे लागत आहे.
रेशनकार्ड दुरुस्ती सुरळीत सुरू ठेवा
रेशनकार्ड दुरुस्तीचे काम काही दिवस सुरू ठेवले जात आहे. त्यानंतर पुन्हा बंद केले जात आहे. तर काही वेळा काही तासांसाठीच दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. दुरुस्तीचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, अशी मागणीही होत आहे.









