कार्डधारक लाभार्थ्यांना दिलासा, ग्राम वन-बेळगाव वनमध्ये सुविधा
बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये नाव, पत्ता आणि नवीन नाव जोडणी केली जात आहे. जानेवारी प्रारंभापासून रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. मात्र, आता 30 जूनपर्यंत रेशनकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया चालणार आहे. रेशनकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया कित्येक दिवस रखडली होती. त्यामुळे अनेकांना शासकीय सुविधांपासूनही दूर रहावे लागले होते. मात्र, आता रेशनकार्ड दुरुस्तीची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. ग्राम वन, बेळगाव वन कार्यालयात रेशनकार्ड दुरुस्ती सुरू आहे. अनेकांच्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने हक्काच्या रेशनपासून वंचित रहावे लागले होते.
मात्र, आता संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रेशनकार्ड दुरुस्त करून दिले जात आहे. नाव बदलणे, पत्त्यात बदल, मोबाईल नंबर आणि नवीन नाव जोडणे आदी कामे केली जात आहेत. मात्र, नवीन रेशनकार्ड वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शासकीय सुविधा आणि रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. ग्रामीण भागामध्ये ग्राम वन कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, बहुतांशी ग्राम वन कार्यालये निष्क्रिय असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. तर काही ग्राम वन कार्यालये वेळेत सुरू नसल्याने नागरिकांना इतरत्र धावपळ करावी लागत आहे. रेशनकार्ड दुरुस्तीसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे. शिवाय पाच वर्षाखालील बालकांसाठी जन्मदाखला आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रेशनकार्ड दुरुस्त करून दिले जात आहे.









