नंदगड प्रतिनिधी: तब्बल दहा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी बिळकी-अवरोळी येथील श्री रूद्रस्वामी देवाचा यात्रौत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी पहाटे रुद्रस्वामी मठावर ध्वजारोहण झाले. त्यानंतर रुद्र होम, महारुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन,
मंगल आरती, दुपारी पालखी उत्सव,महाप्रसाद व सायंकाळी 4 वाजता रथोत्सव झाला. यावर्षी प्रथमच रांगेने देवाचे दर्शन घेण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शांततेत आणि सुव्यवस्थेत दर्शन पार पाडले. पालखीत देवाची उत्सव मूर्ती ठेवून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मठाधीश चन्नबसव देवरु यांच्या मार्गदर्शनाखाली रथोत्सव झाला. गेल्या दोन वर्षापासून मठाच्या समोरील भव्य अशा जागेत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी रथ ओढण्यासाठी भाविकांत मोठा उत्साह दिसून येत होता. परिसरातील बहुतेक शाळा मधून आज श्रावण सोमवार निमित्त सुट्टी राहिल्याने आबाल, वृध्द, महिला, शालेय विद्यार्थ्यांनी दिवसभर यात्रोत्सवाचा आनंद लुटला.
Previous Articleतालुक्यात घुमला शंभो महादेवाचा गजर!
Next Article उचगावात पारायण सोहळय़ाची उत्साहात सांगता