वृत्तसंस्था / कोईमतूर (तामिळनाडू)
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी तामिळनाडू आणि विदर्भ यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात विदर्भचा फलंदाज यश राठोडने राष्ट्रीय प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत यापूर्वी भारताचे विजय हजारे आणि विनोद कांबळी यांनी नोंदविलेला सरस धावसरासरीचा विक्रम मोडीत काढला.
विदर्भ संघातील फलंदाज यश राठोड 60 धावांच्या सरासरीने 2280 धावा जमविताना यापूर्वी भारताचे माजी कसोटीवीर दिवंगत विजय हजारे यांचा 58.38 सरासरीचा तसेच विनोद कांबळीचा 59.67 सरासरीचा विक्रम मागे टाकला. राठोडने 60 धावांच्या सरासरीने 2000 धावांचा टप्पा ओलांडला असून आता तो 12 फलंदाजांच्या यादीमध्ये सहभागी झाला आहे. मात्र हा पराक्रम करताना राठोडकडून एकही द्विशतक नोंदविले गेले नाही.
या सामन्यात तामिळनाडूने 291 धावा जमविल्या. प्रदोश पॉलने 113 तर बाबा इंद्रजितने 96 धावा झळकविताना या जोडीने चौथ्या गड्यासाठी 179 धावांची भागिदारी केली. विदर्भच्या भुतेने 65 धावांत 5 गडी बाद केले.त्यानंतर विदर्भच्या डावामध्ये अमन मोखाडेने 80, ध्रुव शोरेने 82, आर. समर्थने 56 धावा जमविल्या. विदर्भच्या राठोडने 61 चेंडूत अर्धशतक झळकविले. त्यानंतर त्याने आपले शतक खेळाच्या दुसऱ्या सत्रात पूर्ण केले. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील राठोडचे हे नववे शतक आहे. राठोडने 133 धावा झळकविल्या. गेल्या रणजी क्रिकेट हंगामात राठोडने 7 सामन्यात 775 धावा जमविल्या. तसेच राठोडने गेल्या रणजी मोसमात 10 सामन्यात 960 धावा झळकविल्या होत्या तर चालु वर्षीच्या रणजी हंगामात राठोडने 3 सामने 324 धावा जमविल्या. नागालँडविरुद्ध राठोडने पहिल्या डावात 71 तर झारखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद 101 धावा झळकविल्या









