प्रतिनिधी/ बेळगाव
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनतर्फे 28 ते 30 जानेवारी दरम्यान हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त 28, 29 व 30 जानेवारी रोजी इस्कॉन मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, संगीत व नृत्य, नाट्यालीला, श्री भगवद्गीता दर्शनी प्रवचन, गो-शाळा प्रदर्शन, कटपुतळ्यांचा खेळ असे विविध भरगच्च कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष प.पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, आज चंगळवादाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यावर आध्यात्मिक मार्गानेच ज्ञान आणि भक्तीचा प्रकाश दिशादर्शक ठरणार आहे. मनुष्याच्या जीवनात सुख हवे असेल तर त्याचे उत्तर अध्यात्मातच मिळते. म्हणूनच रथयात्रेचा उत्सव करत आहोत. विशेष म्हणजे बेळगाव शहराने हा आपला उत्सव मानला आहे.
यंदाचे रथयात्रेचे 25 वे वर्ष आहे. मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे अत्यंत लघुस्वरुपात रथयात्रा झाली. मात्र, यंदाची रथयात्रा अत्यंत उल्लेखनीय आणि लक्षवेधी असेल. रथयात्रेच्या केंद्रभागी भव्य रथ असून त्यामध्ये राधाकृष्ण आणि निताई गौरसुंदर भगवान विराजमान असतील. कीर्तन गटामध्ये इस्कॉनचे भक्त मिरवणुकीच्या मार्गावर नृत्य करून श्रीकृष्णाच्या नावाचा जप करतील. यंदा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूबरोबरच पाश्चात्य देशांतील भाविकही सहभागी होतील, अशी अपेक्षा स्वामींनी व्यक्त केली.
मिरवणुकीत मुलांचे विविध गट, वेशभूषेसह श्रीकृष्णांच्या लिलांचे सादरीकरण करतील. शिवाय सजविलेल्या बैलगाड्या असतील. याच मार्गावर इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए. सी. भक्तीवेदांत, स्वामी श्री. ल. प्रभूपाद लिखित भक्ती साहित्याचे तसेच प्रसादाचे वितरण इस्कॉनचे साधक करतील. मिरवणुकीचा मार्ग कलात्मक रांगोळ्यांनी सजविला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, इस्कॉन परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सायंकाळी भजन, कीर्तन, श्री राधाकृष्णांची आरती तसेच लहान मुलांचे मनोरंजनपर कार्यक्रम, ज्येष्ठ भक्तांचे प्रवचन, भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडीटेशन पार्क, आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन, प्रसाद वितरण यांचे स्टॉल असणार आहेत. गो-सेवा स्टॉलवर गोमय आणि गोमुत्रावर आधारित उत्पादने असतील. सर्व भक्तांसाठी रात्री प्रसाद असेल. महोत्सवात दीड लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता असून दररोज रात्री 50 हजारांपेक्षा अधिक लोक प्रसादाचा लाभ घेतील, अशी माहिती स्वामीजींनी दिली.
इस्कॉन आध्यात्मिक कार्यक्रमांबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, तणाव व्यवस्थापन, शाळा-महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करते. फूड फॉर लाईन अंतर्गत दर महिन्याला हजारो लोकांना भोजन दिले जाते. शिवाय जांबोटी येथे आरोग्य केंद्र सुरू केले असून तेथे डॉक्टर विनाशुल्क सेवा देत आहेत, अशी माहितीही स्वामी भक्तीरसामृत यांनी दिली. यावेळी श्री रामदास, मदन गोविंददास, संकर्षण दास, नागराज केंदोळे व अन्य सदस्य उपस्थित होते.
रथयात्रा तपशील
दि. 28 जानेवारी रोजी दुपारी 12.45 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे भाविकांचा मेळावा झाल्यानंतर 1 वाजता आरती होईल. 1.30 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल. रथयात्रेचा मार्ग ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड, शहापूर, नाथ पै सर्कल, कंकणवाडी कॉलेज, गोवावेस येथून इस्कॉन मंदिर मैदानाच्या मागे सायंकाळी 6.30 वाजता सांगता होईल.









