साबांखामंत्री नीलेश काब्राल यांची माहिती : सोळा हजार लिटर मोफत पाण्याचा पुनरुच्चार,पाणी वापरासंदर्भात लवकरच श्वेतपत्रिका
प्रतिनिधी /पणजी
घरगुती पाणी ग्राहकांना 16,000 लिटर पाण्याचे वितरण मोफत होणार असल्याचा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केला असून त्यानंतरच्या बिलावर 5 टक्के जादा दरवाढ करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. किती लोकांना हे मोफत पाणी मिळते आणि किती लोक 16000 लिटर पेक्षा जास्त पाणी वापरतात यावर श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
विरोधक मात्र विनाकारण या दरवाढीचा बाऊ करत असल्याची टिपणी त्यांनी केली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या रु. 2228 कोटी रुपये रकमेचा विनियोग कशा प्रकारे करणार याचा तपशीलही त्यांनी सादर केला.
केंद्राकडून 2228 कोटी मंजूर
पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, 2228 कोटीतील सुमारे रु. 500 ते 600 कोटी हे भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, पूल व मार्गावरून इतर कामांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
चौपदरीकरण, रुंदीकरण
नावेली ते कुंकळ्ळी चार पदरी मार्गासाठी रु. 361 कोटी खर्च होणार आहे तर माशे-पोळे बायपाससाठी रु. 177 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी रु. 690 कोटी खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पर्वरी येथे 6 पदरी कॉरीडॉर
पर्वरी येथे 6 पदरी कॉरीडॉरसाठी रु. 600 कोटी खर्च करण्याचे ठरवण्यात आले आहे. कुंकळ्ळी बायपास भूसंपादनकरीता रु. 298 कोटी, बोरी बायपास भूसंपादनासाठी रु. 310 कोटी, काणकोण बायपाससाठी रु. 79 कोटी खर्च केले जाणार आहेत. मडगाव वेस्टर्न बायपाससाठी रु. 12 कोटी खर्च होणार असल्याची माहिती काब्राल यांनी दिली.
नितीन गडकरी यांचे आभार
राष्ट्रीय महामार्गावर शक्य आहे तेथे सर्व्हीस रोड करण्यात आले असून अनेक ठिकाणी ते शक्य नसल्याने तसे रोड केलेले नाहीत, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. रस्ता रुंदीकरण व इतर कामांसाठी एवढी मोठी रक्कम दिल्याबद्दल काब्राल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
बायोडायव्हर्सिटी मंडळाची बैठक झाली असून त्यात विविध निर्णय घेण्यात आले आहेत. पंचायत पातळीवर ते मंडळ स्थापन करण्यासाठी ग्रामसभा घेण्याची सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले.









