प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडसाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याविरोधात म. ए. समितीच्या माध्यमातून आक्रोश आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता झाडशहापूर येथे बेळगाव- खानापूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांनी आज उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या तरी रस्त्यावरील लढाई लढणे महत्त्वाचे आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीत तिबारपीकी शेतजमीन या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यायची नाही, असा निर्धार करण्यात आला. रस्त्यावरील लढाई तीव्र करणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रास्तारोकोला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगाव-खानापूर रोडवरील झाडशहापूर येथे हे आंदोलन होणार आहे. तेव्हा शेतकरी संघटनांनी या रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे, असेदेखील कळविण्यात आले आहे.
तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. श्याम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर यांनी रास्तारोकोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.









