▪️ ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली च्या अनोख्या उपक्रमाची जिल्ह्यात चर्चा; गावविकासासाठी माहेरवाशीणी आल्या एकत्र
दोडामार्ग – प्रतिनिधी
नेहमीच सामाजिक उपक्रमांनी चर्चेत असणा-या ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्लीने श्रावणधारा महोत्सवात खास माहेरवाशीणीसाठी एकत्र आणत गाव विकासावर चर्चा केली. त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषय असणाऱ्या माहेरच्या अनुषंगाने “माझ्या माहेरची साडी” ही स्पर्धा ठेवली यामध्ये रसिका श्रीकृष्ण गवस हिने प्रथम क्रमांक पटकावत त्या माहेरची साडीच्या मानकरी ठरल्या. राज्यात पहिल्यांदाच अशा माहेरच्या माणसासाठी विशेष कार्यक्रम झाल्याच्या भावना महिला वर्गाने व्यक्त केल्या. शिवाय मनसोक्त आनंद लुटला.
ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली ने तीन दिवशीय श्रावणधारा महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महिला सन्मानासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला होता. यामध्ये माहेरवाशीची गावाची ओढ आणि आपुलकीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी आणि गाव विकासात त्यांची भूमिका महत्वाची राहावी यासाठी “माझ्या माहेरची साडी” ही स्पर्धा घेण्यात आली .
यामध्ये रसिका श्रीकृष्ण गवस (प्रथम), निधी नितेश देवळे (द्वितीय), प्रिया बालकनाथ रेडकर (तृतीय)तर उत्तेजनार्थ स्नेहल सचिन मातोंडकर, रश्मी रामदास देसाई यांना साडी देऊन गौरविण्यात आले. गावातील महिलांसाठी दुसऱ्या गटात स्पर्धा घेण्यात आली यामध्ये संचीता दाजी देसाई (प्रथम)नमिता अभिजित देसाई (द्वितीय), मेघना महादेव देसाई (तृतीय) उत्तेजनार्थ तनिषा तुषार देसाई आणि उर्वी उदय देसाई साडी देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे साठ वर्षांवरील महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुभद्रा सुखाजी देसाई (प्रथम),वसुधा आबा खानोलकर (द्वितीय) यांचाही साडी देऊन सन्मान करण्यात आला. सदर साड्या कै. शैला भास्कर देसाई यांच्या स्मरणार्थ मनीषा बर्डे यांनी यांनी पुरस्कृत केल्या होत्या. सदर स्पर्धेचे निवेदन आणि पंच म्हणून प्राथमिक शिक्षक जे. डी. पाटील, सौ. स्वाती पाटील आणि अमित पाटील यांनी काम पाहिले.









