ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरु आहे. या पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काल (गुरुवार) ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीत भेट घेऊन तासभर चर्चा केली. ज्ञानव्यापी मशिद प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद आणि भाजपच्या (BJP) तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भेटीतून केल्याचे मानले जाते. आता या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी आरएसएस व भाजपावर टीका केली आहे.
“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून जाती-धर्मात तेढ निर्माण करुन व्देषाचे राजकारण करणाऱ्या पक्ष, संघटनांचे धाबे दणालेले आहेत. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून आपले इस्पित साधणाऱ्या भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पायाखालची वाळू या पदयात्रेमुळे सरकली आहे. म्हणूनच आरएसएसला मुस्लीम समाजाची आठवण झाली असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीतील मशिदीत जाऊन भेट घेतली.” अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : सरसंघचालक भागवतांकडून दिल्लीत मशिदीला भेट, उमर अहमद इलियासी यांच्याशी बंद दाराआड चर्चा
सरसंघचालक मोहन भागवत व इमाम इलियासी यांच्या भेटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले पुढे म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरु होऊन १५ दिवस झाले असून या यात्रेला समाजाच्या सर्वच घटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशात सध्या सुरु असलेल्या भाजपा व आरएसएसच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ने योग्य उत्तर दिले असून देशाची एकता व विविधता अबाधित ठेवणे, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची ही पदयात्रा देशभरातून जाणार आहे. सातत्याने हिंदू मुस्लीम वाद उकरून काढणे, लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, मदरसे यासारखे मुद्दे उकरून काढून समाजात तणाव वाढवणे व सामाजिक शांतता बिघडवणे हे संघ विचाराच्या पक्षाचे काम सुरु असून याचा फायदा उठवत भाजपा आपले राजकारण करत आहे. याच पदयात्रेत पाच-सहा वर्षाच्या मुस्लीम मुलीने राहुल गांधी यांची भेट घेतली तर त्यावरही टीकाटीप्पणी करून भाजपाने आपला मुस्लीम द्वेष व्यक्त केला.
मुस्लीम समाजाची साधी टोपीही ज्या लोकांना आवडत नाही त्यांना आज मशिदीत जाऊन इमामाची भेट घ्यावी लागते हेच काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे मोठे फलित आहे. पण आता वेळ निघून गेली असून भाजपा वा आरएसएसने मुस्लीम प्रेमाचा कितीही देखावा केला तरी मुस्लीम समाज त्यांच्या या बेगडी प्रेमाला बळी पडणार नाही. हा देश सर्वांचा आहे, विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे आणि ती जपण्याचे काम काँग्रेस करत आहे, असेही पटोले म्हणाले.