हेमंत सोरेन यांचे वादग्रस्त विधान, भारतीय जनता पक्षाकडून जोरदार पलटवार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे उंदरांसारखे असून ते जेथे जातील तेथे केवळ विनाशच घडवितील, असे वादग्रस्त विधान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे. राज्यातील साहेबगंज येथील एका व्हर्चुअल सभेत त्यांनी हे आरोप केले होते. आसाममध्ये आता सर्वत्र संघाचा संचार झालेला आह. त्यामुळे तेथील हिंदू-मुस्लीम एक्य धोक्यात आले आहे. आता ही संघाची पिलावळ झारखंडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे.. हे उंदिर जेथे जातील तेथून त्यांना हाकलून लावा. ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी मुक्ताफळे हेमंत सोरेन यांनी त्यांच्या व्हर्चुअल भाषणात काही दिवसांपूर्वी उधळली होती. त्यांच्या या टीकेला भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्त दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ‘हिंदू सिंहांची’ असून ती सनातन धर्माला त्याचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या संघटनेच्या कार्याची किंमत सोरेन सारख्यांना कधीच कळणार नाही, अशी टीका झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमर कुमार बौरी यांनी केली आहे.
भोगनादीह येथे लोकसंख्यापरिवर्तन
झारखंडमधील संथाल परगाण्यात 1885 मध्ये ब्रिटीशांविरोधात जोरदार उठाव झाला होता. भोगनादीह हे या उठावाचे केंद्र होते. त्यावेळी येथे 40 हजार आदीवासी कुटुंबे रहात होती. आता त्यांची संख्या केवळ सात आहे. उरलेली हजारो कुटुंबे गेली कोठे ? असा प्रश्न बौरी यांनी उपस्थित केला आहे. आता भोगनादीह भागात बांगला देशातून घुसखोरी केलेल्या मुस्लीमांचे वर्चस्व आहे. हे लोकसंख्या परिवर्तन राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि कारस्थानांमुळे झाले आहे, असा आरोप बौरी यांनी केला. सोरेन यांनी संघाला दोष देण्यापेक्षा स्वत:ची धोरणे तपासून पहावीत. परिस्थिती किती गंभीर आहे हे त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही. झारखंडमध्ये झपाट्याने आदीवासींचे धर्मांतर होत आहे. ते रोखण्याची आयश्यकता आहे, अशी सूचना अमर कुमार बौरी यांनी केली आहे.