वार्ताहर/सांबरा
सांबरा येथे रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व दसरा महोत्सवानिमित्त बेळगाव ग्रामीण विभागाच्या वतीने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये पहिल्यांदाच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. दुपारी चार वाजता एअरपोर्ट क्रॉस येथून पथसंचलनाला प्रारंभ झाला. पथसंचलनानिमित्त गावांमध्ये सजावट करून पथसंचलन जाणाऱ्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर पथसंचलन सुरू असताना ग्रामस्थांकडून जयघोष करण्यात येत होता. त्यानंतर मेन रोडमार्गे पेठ गल्ली, मंगळवार पेठ, मारुती गल्ली, काजगार गल्ली, शुक्रवार पेठ, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, मेन रोडमार्गे एअरपोर्ट मैदानपर्यंत पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर पथसंचलनाचे सभेमध्ये रूपांतर झाले. प्रारंभी भगवा ध्वज फडकावून सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाड यांनी कार्यकर्त्यांना बौद्धिक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. संघाची स्थापना, संघाचे कार्य व संघाचे उद्दिष्ट व पुढील कार्य याबद्दल राघवेंद्र कागवाड यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले. अॅड. लक्ष्मण पाटील यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत शेवटी आभार मानले. याप्रसंगी बेळगाव ग्रामीण व शहर परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









