वृत्तसंस्था/ शीमकेंट, कझाकस्तान
मंगळवारी येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मनूने अंतिम फेरीत 219.7 गुणांसह दक्षिण कोरियाच्या जिन यांग (241.6) आणि चीनच्या कियानके मा (243.2) यांच्या मागे स्थान मिळवले. कनिष्ठ महिलांच्या एअर पिस्तूल नेमबाजीत रश्मिका सहगलने वैयक्तिक व सांघिक अशी दोन सुवर्णपदके पटकावण्याचा पराक्रम केला.
कनिष्ठ एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या रश्मिकाने सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीत तिने 582 गुण मिळविले होते. तिने वंशिका चौधरी (573) व मोहिनी सिंग (565) यांच्या साथीने सांघिक सुवर्णपदकही मिळविले. भारताने गेल्या दोन दिवसांत 10 मी. एअर पिस्तूल विभागातील पुरुष व महिला गटात मिळून वैयक्तिक कांस्य सांघिक रौप्य व सांघिक कांस्य मिळविले. तर कनिष्ठ विभागात वैयक्तिक दोन सुवर्ण मिळविली आहेत. कपिल बैन्सला व रश्मिका सहगल यांनी ही पदके मिळविली आहेत. याशिवाय कपिलने सांघिक रौप्यही मिळविले. कनिष्ठ विभागात जोनाथन गविन अँटनीने एअर पिस्तूल प्रकारांत कांस्य तर गिरीश गुप्ताने युवा विभागातील एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण व देव प्रतापने कांस्य मिळविले. याशिवाय युवा संघाने सांघिक सुवर्णही पटकावले. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्यपदके मिळविली आहेत.
केवळ रँकिंग पॉइंट्ससाठी स्पर्धेत सहभागी झालेली एशा सिंग 577 गुणांसह नवव्या स्थानावर होती तर सुऊची सिंग 574 गुणांसह 12 व्या स्थानावर होती. पलक 573 गुणांसह 17 व्या स्थानावर होती. तर सुरभी राव (आरपीओ) 570 गुणांसह 25 व्या स्थानावर होती. 23 वषीय मनूने 583 गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आणि क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहिली. मनूने सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले. मनू, सुऊची आणि पलक यांनी 1730 गुणांसह कामगिरी केली. हे गुण दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोरिया प्रजासत्ताक (1731) पेक्षा एक आणि सुवर्णपदक विजेत्या चीनपेक्षा 10 गुणांनी मागे आहेत.









