‘छावा’ चित्रपटात साकारणा भूमिका
दक्षिणेत स्वतःचे स्थान निर्माण केल्यावर रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये नाव कमावू पाहत आहे. मागील वर्षीच रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘गुडबाय’ होता. यानंतर ती ओटीटीवर ‘मिशन मजनु’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसून आली होती.
रश्मिकाचा ‘गुड बाय’ चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. परंतु आता तिच्याकडे एकाहून एक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. रश्मिका लवकरच विक्की कौशलसोबत मोठय़ा पडद्यावर दिसून येणार आहे.

विक्की कौशल हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या एका ऐतिहासिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असल्याचे सांगण्यात येत आहे. यात विक्की कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. रश्मिका मंदाना देखील या चित्रपटात सामील असेल. चित्रपटात रश्मिकाला महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. या भूमिकेसाठी तिची लुक टेस्ट घेण्यात आली होती. चित्रपटातील तिची भूमिका ऐतिहासिक स्वरुपाची असल्याने तिच्याककडून याकरता विशेष तयारी करवून घेण्यात येणार आहे.

अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’मध्ये दिसून आल्यावर रश्मिकाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत तेलगू चित्रपटसृष्टीत दिसून येणारी रश्मिका आता बॉलिवूडमध्ये सक्रीय दिसून येत आहे. संदीप रेड्डी वांगाचा चित्रपट ‘ऍनिमल’मध्ये ती रणवीर कपूरसोबत झळकणार आहे. ऍनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर ती अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ चित्रपटात दिसून येईल.









