सांखळी : विद्यमान नगरसेवक रश्मी देसाई आणि धर्मेश सगलानी यांच्यांत अटीतटीची लढत होणार असून या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. धर्मेश सगलानी हे टुगेदर फॉर सांखळीचे प्रमुख असून सांखळी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचेही ते नेते आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या दोन निवडणुकामध्ये सगलानी नगरपालिकेत भाजपा विरोधात तटस्थपणे भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. तर भाजपच्या रश्मी देसाई या अनुभवी नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या निवड झाल्यास त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामुळे पूर्ण मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
सर्वच उमेदवारांची प्रचारात आघाडी
या निवडणुकीत प्रभाग क्र 4 हा महत्त्वाचा प्रभाग म्हणून पाहिले जात आहे. येथे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून तिन्ही उमेदवारांनी प्रचारावर जोर दिल्याचे चित्र आहे. आपला विजय नक्की असल्याचा दावा तिन्ही उमेदवारांकडून केला जात आहे. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवक व एक अपक्ष उमेवार असल्याने मतदार कोणाला घरी पाठवतात हे पाहावे लागेल.









