उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर : नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला
सांखळी ; मंगळवारी सांखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची बिनविरोध निवड आज जाहीर करण्यात आली.प्रथम सांखळी नगरपालिकेच्या कॉन्फरन्स सभागृहात सर्वप्रथम सर्व नगरसेवकांना शपथ देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांची निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी या दोन्ही पदांसाठी एक एकच अर्ज आल्याने नगराध्यक्ष पदासाठी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्ष पदासाठी आनंद काणेकर यांची निवड जाहीर केली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर रश्मी देसाई यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नगरपालिकेच्या कॉन्फरन्स सभागृहात संपन्न झालेल्या अशा पदग्रहण सोहळ्याला नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू पोरोब, रश्मी देसाई, प्रवीण ब्लेगन, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, दीपा जल्मी व अंजना कामत यांची उपस्थिती होती. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी निकाल लागल्यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांबरोबर झालेल्या बैठकीत रश्मी देसाई यांची नगराध्यक्षपदी तर आनंद काणेकर यांची उपनगराध्यक्षपदी यांची नावे निश्चित झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या दोघांनीही आपापल्या पदांसाठी सांखळी नगरपालिका कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या दोन्ही पदासाठी अन्य एकही अर्ज न आल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्याची औपचारिक घोषणा शपथग्रहण व निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी केली. यावेळी पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांची उपस्थिती होती.
सांखळीला रोल मॉडेल बनविणार : रश्मी देसाई
विकासाच्या दृष्टीने साखळी शहर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहेत. तरीही या शहरात आणि पालिका क्षेत्रात नगरपालिका पातळीवरून आवश्यक असलेला सर्व विकास साधून साखळीला राज्यात ‘रोल मॉडेल’ बनविण्यासाठी आपण कार्य करणार. साखळीचा साधनसुविधा विकासाबरोबरच मानवी विकासावरही तितक्याच गांभीर्याने भर दिला जाणार आहे. सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविताना या शहरात सर्व साधनसुविधा विकास उपलब्ध करून देणार. या सर्व कामांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जास्तीत जास्त सहकार्य लाभणार असून लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन साखळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी केले.
नगराध्यक्षपदी निवड जाहिर झाल्यानंतर रश्मी देसाई या पत्रकारांशी बोलत होत्या. स्वच्छ व सुंदर साखळीची संकल्पना सत्यात उतरवताना साखळीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. कचरा उचल प्रक्रिया व त्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्पातील काम यापुढे जलद गतीने होणार आहे. लोकांच्या समस्या समजून घेत त्यानुसार काम करणार, असेही आश्वासन नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी म्हटले. नूतन उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणार. सांखळीत लोकांनी समस्यामुक्त जीवन जगावे. यासाठी आपण झटणार. साखळी बाजारात एक व्यवस्था निर्माण करून बाजराला वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे, असे सांगितले.
6 मराठीत, 3 कोकणीत, तर तीन नगरसेवक इंग्रजीत शपदबध्द
या नगरपालिकेत निवडून आलेल्या एकूण 12 पैकी 6 नगरसेवकांनी मराठीतून शपथ घेतली. त्यात निकिता नाईक, प्रवीण ब्लेगन, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, आनंद काणेकर व दीपा जल्मी यांचा समावेश आहे. सिद्धी प्रभू पोरोब, दयानंद बोर्येकर व अंजना जल्मी यांनी कोकणीतून शपथ घेतली. तर यशवंत माडकर, रश्मी देसाई व रियाझ खान या नगरसेवकांनी इंग्रजीत शपथ घेतली.
एक हाती सत्ता मिळविण्याचा मुख्घ्यमंत्र्यांचा करिष्मा
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांखळी नगरपालिका निवडणुकीत भाजपने आपल्या सर्व उमेदवार उमेदवारांनी निवडणूक आणण्याचा विक्रम केला. यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या होमग्राऊंड असेलल्या सांखळी पालिकेवर एक हाती सत्ता मिळविण्याचा करिष्मा केला आहे.









