वृत्तसंस्था / शारजा
अफगाण क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच अष्टपैलू रशीद खानने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम करताना यापूर्वी न्यूझीलंडच्या टीम साऊदीचा विक्रम मोडीत काढला. सध्या सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेतील युएई विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रशीद खानने आपल्या चार षटकात 21 धावांत 3 गडी बाद केले. या कामगिरीमुळे या सामन्यात अफगाणने युएईचा 38 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने टी-20 प्रकारात 164 बळींचा विक्रम नोंदविला होता. हा विक्रम अफगाणचा कर्णधार रशीद खानने मोडीत काढताना 98 सामन्यात 13.75 धावांच्या सरासरीने 165 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने टी-20 प्रकारात 8 वेळा चारपेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.
अफगाण आणि युएई यांच्यातील सामन्यात अफगाणने 20 षटकात 4 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर युएईने 20 षटकात 150 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 38 धावांनी गमवावा लागला. अफगाणच्या डावामध्ये अटलने 40 चेंडूत 54 तर इब्राहीम झेद्रानने 40 चेंडूत 63 धावा झोडपल्या. युएईच्या डावामध्ये अफगाणच्या अशरफने 24 धावांत 3 तर फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कर्णधार रशीद खानने 21 धावांत तीन बळी मिळवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला.









