वृत्तसंस्था/ काबूल
16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया संयुक्त अरब अमिरातविरुद्धच्या (युएई) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अफगाण क्रिकेट संघाचे नेतृत्व फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज रशीद खानकडे सोपवण्याचा निर्णय अफगाण क्रिकेट संघटनेने घेतला आहे.
या मालिकेसाठी अफगाणचा संघ संयुक्त अरब अमिरातकडे प्रयाण करणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अफगाण आणि संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळामध्ये ही मालिका खेळवण्याबाबत करार झाला होता. या मालिकेसाठी क्रिकेट अफगाणने 22 जणांचा संघ जाहीर केला आहे. 2021 च्या जुलैमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण संघाचे कर्णधारपद रशीद खानने भूषवले होते. पाकमध्ये सुरू असलेल्या सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत अफगाणचे बरेच क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याने त्यांना संयुक्त अरब अमिरातमधील टी-20 मालिका हुकणार आहे.
उभय संघातील पहिला सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे. संयुक्त अरब अमिरातमधील तिरंगी मालिका संपल्यानंतर अफगाणचा संघ मार्च महिन्यात पाकमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. मात्र, या मालिकेतील सामन्यांची ठिकाणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. घोषित करण्यात आलेल्या 22 जणांच्या संघातील अंतिम 17 खेळाडूंची या आगामी टी-20 मालिकेसाठी निवड केली जाईल.
अफगाण प्राथमिक संघ- रशीद खान (कर्णधार), रेहमानउल्ला गुरबाज, अब्दुल रेहमान रेमानी, अफसर झेझाई, अझमतुल्ला ओमरझाई, बिलाल सामी, फरीद अहमद मलिक, एफ. फरुकी, गुलबदीन नायब, हजरतुल्ला झेजाई, इब्राहिम झेद्रान, मुझीब उर रेहमान, नजीबुल्ला झेद्रान, एन. खरोटी, नवीन उल हक, निजात मसूद, नूर अहमद, रहमत शहा, एस. अताल, एस. कमाल, एस. अश्रफ आणि झहीर खान.









