वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाण क्रिकेट संघातील अष्टपैलू रशिद खान याला पाठ दुखापतीच्या समस्येमुळे गेले काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते. या दुखापतीवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर रशिद खानला विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे त्याला अलिकडच्या काळामध्ये अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. रशिद खानची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली असून त्याने सराव सत्रामध्ये पुनरागमन केले आहे.
आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी रशिद खानची अफगाण संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 15 जणांचा अफगाण संघ जाहीर करण्यात आला आहे. या दुखापतीमुळे रशिद खानला बिग बॅश लीग, दक्षिण आफ्रिका टी-20 स्पर्धेत सहभाग दर्शविता आला नाही. तसेच अफगाण संघाच्या संयुक्त अरब अमिरात, भारत आणि श्रीलंका विरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेत रशिद खानला खेळता आले नव्हते. भारतामध्ये गेल्यावर्षी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रशिद खानने सर्वाधिक म्हणजे 11 गडी बाद केले होते. आता येत्या जून महिन्यात अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी रशिद खानने आपल्या जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे. रशिद खानचा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून समावेश राहिल. गुजरात टायटन्सचा सलामीचा सामना 24 मार्चला होणार आहे. क्रिकेट क्षेत्रात रशिदचे पुनरागमन झाल्याने गुजरात टायटन्सचा संघ निश्चितच भक्कम होईल.









