सगळ्या ग्रहांमध्ये गुरु ग्रह अत्यंत शुभ
तुमच्या ओळखीचा एक माणूस नक्कीच असा असेल की, जो अत्यंत चांगला आहे पापभीरू आहे, धार्मिक आहे, देवाचे फार फार करतो, पण त्याच्याबरोबर कायम वाईटच घडते! असे का? त्याचे उत्तर तुम्हाला आज मिळेल. सगळ्या ग्रहांमध्ये गुरु ग्रहाला अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये गुरु आहे त्यांच्या पत्रिकेतील हजारो दोष नाहीसे होतात असे काही ज्योतिषांचे म्हणणे आहे. विवाहाकरता गुऊबळ बघणे (कॉमन भाषेत बाशिंग बळ) गरजेचे असते. मुंजीकरता गुरुचे बळ आवश्यक असते, असे प्राचीन ज्योतिषशास्त्र सांगते. पण विचार करा आजच्या काळात गुरुकडे इतके बळ राहिले आहे का? गुरु हा सात्विक वृत्तीचा, दुसऱ्यावर उपकार करणारा, सहनशील, ज्ञानी पण अभिमान न बाळगणारा, सत्त्वशील म्हणजे चांगल्या पॅरेक्टरचा, कधीही कोणतेही चुकीचे काम न करणारा, परस्त्री, परधन याकडे ढुंकूनही न बघणारा, कोणालाही न फसवणारा असा आहे. मग आजच्या काळामध्ये लोकांमध्ये असे गुण आहेत का? त्याचे सरळ सरळ उत्तर ‘नाही’ असेच आहे. देव आणि दानव यांना आपल्या अस्तित्वात घेऊन जाणारे आपण, बऱ्याच वेळेला दानवाला प्रिय असलेल्या गोष्टीच करतो! म्हणून गुरुपेक्षा आजच्या काळात शुक्राकडे, राहूकडे, केतूकडे सत्ता जास्त आहे असे माझे मत आहे.
गुरु हा संततीचा कारक, नशिबाचा कारक, धर्माचा कारक, ग्लोबल इकॉनॉमीचा कारक आहे म्हणजे संतती, नशीब, धार्मिकता, पैसे यांच्या बाबतीत तुमचे असलेले भाग्य हा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह ठरवतो. तुमच्या कुंडलीत गुरु कुठल्या प्रकारे फळ देत आहे म्हणजे तो चांगले फळ देत आहे की, वाईट फळ देत आहे हे काही लक्षणांवरून सहज ठरवता येते आणि त्यावर साधेसाधे उपायही करता येतात. गुरु गृह हा बिघडलेला आहे याचे पहिले लक्षण म्हणजे डोक्यावरचे केस जाणे, थोडक्मयात टक्कल पडणे, पोटाच्या विकारांचा कारकही गुरु ग्रह हाच आहे. इतक्मया शुभ मानल्या गेलेल्या गुरु ग्रहाला पॅन्सरसारख्या रोगाचा कारकही मानले जाते. कायम पोटात गॅस होणे, पोटदुखी, पोटातल्या अवयवांना सूज येणे, वजन प्रमाणाबाहेर वाढणे, चांगले काम करूनसुद्धा समाजामध्ये बदनामी होणे किंवा प्रसिद्धी न मिळणे, वैवाहिक जीवनामधील समस्या, विवाह लवकर न होणे, संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम, दुसऱ्याला आपली बाजू समजावता न येणे, कायम आर्थिक चणचण, कोणतेही काम वेळेवर पूर्ण न होणे, श्वासासंबंधी असलेले रोग, वडीलधाऱ्या व्यक्तींशी न पटणे, मन अधार्मिक होणे, देव, गुरु, ब्राह्मण, पुरोहित यांच्याबद्दल आदर नसणे यासारख्या लक्षणांवरून आपल्याला गुरुचे उपाय करणे गरजेचे आहे का, हे कळते. यावर उपाय म्हणजे पहिली गोष्ट वडीलधाऱ्या व्यक्तींचा, गुरुचा, पुरोहितांचा, गुरुजींचा आदर करायला शिकले पाहिजे.
तुमच्या कुंडलीत गुरु कितीही चांगला असला आणि तुम्ही जाणता अजाणता यांचा अपमान करत असाल तर तो गुरु वाईट फळच देणार हे लक्षात घ्या. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्याने गुरु सुधारतो, गुरुवारचे व्रत केल्याने गुरु चांगले फळ देतो, विष्णुसहस्त्रनामाचा पाठ हा रामबाण उपाय आहे, खाण्यामध्ये पिवळ्या वस्तूंचा समावेश करणे जसे की बेसन, बेसनाचे लाडू, वरण, इत्यादी याने गुऊला बळ मिळते. केशराचा टिळा ललाटी लावण्याने गुरुला चांगले बळ मिळते. नियमित मंदिरात जाणाऱ्या लोकांना गुरु चांगले फळ देतो. आपले वर्तन नैतिक ठेवल्याने, फसवाफसवी न केल्याने गुरु चांगले फळ देतो. आपले आचरण शुद्ध ठेवल्याने आणि कायम सत्य बोलल्याने गुरुला बळ देता येते. गुरु जर खराब असेल तर चुकूनही पुष्कराज धारण करू नये. तुमची राशी धनु किंवा मीन नाही म्हणून तुम्ही पुष्कराज धारण करावा यासारखी चूक दुसरी नाही. घरातील ईशान्य कोपऱ्यात हळदीची गाठ ठेवल्यानेसुद्धा गुरु चांगले फळ देतो.
मेष
तब्येतीकडे लक्ष द्या. काहीतरी नुकसान होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे सांभाळून रहा. घरातील मौल्यवान वस्तूंचा नीट सांभाळ करा. आपणच बेफिकिरीने राहून मग दुसऱ्यावर चोरीचा आळ घेण्यात काही शहाणपणा नाही. काहीतरी शारीरिक पीडा संभवते. अंग मेहनतीची कामे सांभाळून करा. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांभाळून राहण्याची सूचना देत आहे.
उपाय – मुक्मया जीवांना खाऊ घाला.
वृषभ
जोडीदाराबरोबर हा आठवडा चांगला घालवाल. स्वत:चा व्यवसाय असेल तर तो चांगला चालेल. थोडी मेहनत जास्त घ्या. प्राप्ती चांगली होईल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्मयता आहे. निदान त्या दृष्टीने पावले तरी पडतील. एखादी गहाळ झालेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये असाल तर आपल्या कामाचे चीज होईल. मानवतेच्या दृष्टीकोनातून पहा व मन प्रसन्न ठेवा.
उपाय – पिंपळाला प्रदक्षिणा घाला.
मिथुन
अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. लॉटरीचे तिकीट काढण्यास हरकत नाही. नशीब आजमावून पहा. पण काहीतरी मनाचे बिनसलेले असेल. कसलीतरी हूरहूर लागण्याची शक्मयता आहे. मन शांत व प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटण्याची शक्यता आहे. पण इतरांची काळजी करता करता स्वत:च्या तब्येतीकडे पण लक्ष द्या.
उपाय- नामस्मरण करा.
कर्क
सत्संगाचा लाभ मिळण्याची शक्मयता आहे. एखाद्या तीर्थक्षेत्री प्रवास होईल. हा आठवडा आनंदात जाईल. एखादे धार्मिक कार्य घडेल. परोपकार घडण्याची शक्मयता आहे अथवा करावासा वाटेल. असे जेव्हा वाटेल तेव्हा विचार करू नका. ते कृतीत आणा. सात्विक समाधान आणि आनंद मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद लाभतील. एकंदरीत हा आठवडा सात्विक समाधानाचा जाईल.
उपाय – शिवाराधना करा.
सिंह
उद्योग धंद्यामध्ये भरभराट अथवा नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याची शक्मयता दिसते. तुमच्या कोणत्यातरी कार्यामुळे अथवा गुणामुळे तुमचे सर्वत्र कौतुक होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील. समाजात आपली मान उंचावत जाईल. हा आठवडा आपल्याला मानसन्मान देऊन जाईल. कर्ज प्राप्तीसाठी धडपडत असाल तर मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय – सूर्योदयाच्या वेळेस रोज सूर्याला अर्घ्य द्या.
कन्या
स्वतंत्र उद्योगात असाल तर उद्योग चांगला चालेल व प्राप्ती चांगली होईल. नोकरीत असाल तर नोकरीतून लाभ मिळेल. वडील, भावंडाबरोबर आपला हा आठवडा छान जाईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. त्यांच्याबरोबरही आपला वेळ छान जाईल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. चांगल्या उंची वस्तूची खरेदी कराल. एकंदरीत आठवडा चांगला जाईल.
उपाय – दत्त उपासना करा.
तूळ
खर्च सांभाळून करा. आपण कुठे खर्च करतो आणि त्याची अगदी जऊरी आहे का, याचा विचार करूनच खिशात हात घाला. तब्येतीकडे लक्ष द्या. तब्येत थोडीफार बिघडण्याची शक्मयता आहे. काळजी घ्या. नोकरी धंद्यात काळजीपूर्वक वागा. अडचणीना सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. सर्व बाजूने सांभाळून राहण्याचे दिवस आहेत. शत्रू संधी साधू पाहतील. त्यांना चान्स देऊ नका.
उपाय- हनुमान चालीसाची पारायणे करा.
वृश्चिक
मन चंचल होऊ देऊ नका. वाणीवर संयम असू द्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या उद्योगात प्रामाणिक रहा. नोकरीत असाल तर वरिष्ठ लोकांशी प्रामाणिक रहा. प्रामाणिक रहाल तर आपला चांगला प्रभाव पडून आपली प्रगती व नावलौकिक होईल. जोडीदाराबरोबर समजुतीने घ्या. या साऱ्यांचा ताळमेळ आपण व्यवस्थित घातलात तर हा आठवडा सुंदर जाईल.
उपाय – दीन दुबळ्यांना मदत करा.
धनु
वडिलोपार्जित संपत्तीबाबत चर्चा होण्याची शक्मयता आहे. त्यातून कदाचित लाभसुद्धा होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सुख समाधान मिळेल. आपल्या समजूतदार बोलण्याने इतरांवर छाप पाडाल. आपल्या देवघेवीच्या व्यवहारातून आपल्याला लाभ होण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला समाधानकारक जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी कळेल.
उपाय – मुंग्यांना साखर घाला.
मकर
आपल्या सुसंवादाने व आपल्या एकंदरीत वागणुकीने समोरच्या माणसावर चांगलीच छाप पाडाल. छोट्या भावंडाबरोबर कुठेतरी छोट्या प्रवासाची आखणी कराल. आणि तो बेत अंमलात येण्याचीपण शक्मयता आहे. कदाचित तो प्रवास रेल्वेतून कराल. मित्र व शेजारी पाजारी यांचीदेखील आपल्याला मदत होईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल.
उपाय – कुलदेवतेची उपासना करा.
कुंभ
मातेचे सुख मिळेल. नवीन वाहन खरेदीची शक्मयता आहे. कोणता तरी अभ्यास चालला असेल तर त्यात यश मिळेल. मातेच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. जमिनीच्या बाबतीत काही व्यवहार करीत असाल तर यश मिळण्याची शक्मयता आहे. मन चंचल होऊ देऊ नका. सांभाळून राहण्याची सुद्धा गरज आहे. एकंदरीत हा आठवडा समाधानकारक जाईल.
उपाय – महालक्ष्मीची उपासना करा.
मीन
संततीच्या वागणुकीकडे लक्ष द्या. त्यांच्या अभ्यासात काही अडथळे तर नाहीत ना याकडे लक्ष द्या. त्याच्या अभ्यासात मार्गदर्शन करा. विद्याभ्यासात प्रगती होईल. लॉटरी वगैरे तत्सम प्रकारातून अचानक धनलाभ संभवतो. एखादा कलागुण जोपासायचा प्रयत्न करा. संततीमध्ये एखादी कला तुम्हाला दिसली तर त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करा.
उपाय – गुरुची आराधना करा.





