तुमचे ग्रह आणि तुमचाच अंदाज!!! (भाग -3)
(1) रवी ग्रह: महत्व- बिघडल्याची लक्षणे आणि उपाय: रवी हा ग्रहमालेतील राजा आहे. चराचर सृष्टीला प्रकाश देणारा-म्हणून आपल्या शरीरातील डोळे आणि बघण्याची शक्ती ‘रवीच्या अंमलाखाली’ येते. रवी हा राजा असल्यामुळे सहजरीत्या स्वाभिमान आणि अहंपणा आला, ताठपणा आला. म्हणजेच आपल्या शरीरातील पाठीच्या कण्यावर रवीचा अमल आहे. ‘कुटुंब प्रमुख’ या नात्याने आपल्या वडिलांना रिप्रेझेंट करणारा तो रवीच ग्रह. राजा असल्यामुळे मान, सन्मान आला. म्हणजेच तुम्हाला समाजात मिळणाऱ्या मान सन्मानाला कारणीभूत असलेला रवी ग्रह आहे. शत्रूंना ‘परास्त’ करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे, म्हणून शरीरातील प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी ही रवीच्या अंमलाखाली येते. आजारी पडल्यानंतर आपण जी औषधे घेतो, त्यातील एŸलोपॅथीची औषधे सुद्धा रवीच्या अधिपत्याखाली येतात. अधिकार गाजवणे, चांगले नोकर चाकर असणे, राजेशाही थाट इत्यादी सगळे जे तुम्हाला मिळते, ते रवी मुळेच मिळते. मंगळ, गुऊ, चंद्र यासारखे रूढी पाळणारे ग्रह त्याचे मित्र आहेत. राहू आणि केतू ‘रवीला’ ग्रहण लावतात. तुमच्या कुंडली मधील रवी बिघडला आहे, हे कसे ओळखावे, याची लक्षणे सांगतो. जर वारंवार आजारी पडत असाल, वडिलांशी तुमचे अजिबात पटत नसेल, वडिलांकरता तुमच्या मनामध्ये, आदर, प्रेमभाव, धाक नसेल किंवा वडीलही तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, काहीही कारण नसताना तुमच्यावर आळ येत असेल, अचानक पाठ दुखीसारखे आजार त्रास देत असतील, डोळ्यांचे विकार असतील, आपण बोलतो एक आणि समोरचा समजतो दुसरे असे होत असेल, मित्रमंडळी कमी असतील किंवा जी असतील त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल जेवढा हवा तेवढा आदर नसेल, समाजातील लोकांमध्ये तुमच्याविषयी ‘गैरसमज विनाकारण’ पसरत असतील, व्यवसाय वारंवार बदलावा लागत असेल, नोकरी धंद्यामध्ये प्रगती होत नसेल तर, समजावे की, तुमच्या कुंडलीतील रवी/सूर्य बिघडलेला आहे आणि या ना, त्या प्रकारे त्याची दशा किंवा अंतर दशा चालू आहे. मग यावर उपाय काय करावा, ज्याने तुम्हाला फायदा होईल? खाली दिलेले उपाय निर्धोक आहेत, कुणीही हे उपाय केले तरी काहीही अपाय होणार नाही, याची खात्री बाळगा.
(1) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले संबंध सुधारले पाहिजे. ‘सूर्य म्हणजे तुमचे वडील’ हे लक्षात घ्या. तुमच्या वडिलांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल तर, रवीचे कितीही कसलेही दोष असले तर,ते नाहीसे होतात, हे शंभर टक्के सत्य आहे. शांती, मंत्र, तंत्र करण्यापेक्षा हा उपाय कितीतरी पटीने जास्त फळ देतो, हा अनुभव आहे.
(2) सूर्याच्या प्रकाशात जास्तीत जास्त वेळ घालवल्याने सुद्धा ‘सूर्याच्या अशुभ फळांमध्ये’ कमी येते. याकरता सूर्य त्राटक हा अतिशय प्रभावी उपाय आहे. उगवत्या सूर्याकडे पापण्या न झाकता एखादे मिनिटे बघणे, त्याला सूर्य त्राटक असे म्हणतात. लक्षात घ्या, उगवत्या सूर्याकडेच पाहायचे आहे, डोळ्याला इजा करून घ्यायची नाही आहे.
(3) सूर्याला अर्घ्य देणे: एका तांब्याच्या भांड्यात लाल मिरचीचे सात दाणे, थोडे कुंकू आणि एक लाल फुल घालून आपल्या डोक्मयाच्या वरून, सूर्याकडे पहात ते पाणी सोडणे आणि त्या पाण्याच्या धारेतून सूर्याकडे पाहणे याला सूर्याला जल देणे किंवा अर्घ्य देणे म्हणतात. हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय आहे.
(4) सूर्याच्या वस्तू दान देणे: तांब्याचे पात्र, गहू,लालचंदन, लाल वस्त्र, अशा योग्य व्यक्तीला दान दिले पाहिजे की, जी व्यक्ती मध्यम वयाची, उंच, डोक्मयावर केस कमी असलेली किंवा विरळ असलेली आणि गरजू असावी.
(5) ‘औषधी स्नानसूर्याची’ पीडा दूर करण्याकरता आंघोळीच्या पाण्यात कुंकू, गव्हाचे पीठ, थेंबभर मध हे घालावे.
(6) रत्न धारण करणे: काही अति शहाणे लोक सूर्य खराब असताना माणिक घालण्याचा सल्ला देतात. खरोखर यांच्या ‘बुद्धीची कीव करावीशी’ वाटते. जो ग्रह त्रास देतोय, त्याची ताकद वाढवण्याचा हा प्रकार आहे. याकरता माणिक अजिबात धारण न करता, ऊर्जा संस्कार केलेला स्टार ऊबी किंवा ‘तारांकित सूर्यकांतमणी’ धारण करणे, हा आणखी एक उपाय आहे.
(क्रमश:)
मेष
तुम्ही केलेल्या कष्टांचा योग्य तो परतावा मिळेल. एखाद्या नवीन कामाची संधी मिळेल. जवळची एखादी व्यक्ती विश्वासघात करू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये कोणावरही अति विश्वास ठेवू नका. एखादी वस्तू गहाळ होऊ शकते. करमणूकी करता प्रवास कराल. मित्रांच्या मदतीने कामाच्या ‘नवीन संधी’ मिळतील. आर्थिक नियोजन चुकण्याची शक्मयता आहे. खर्च वाढू शकतो.
उपाय – लहान मुलांना आंबट-गोड वस्तू वाटावी.
वृषभ
तुम्ही जे काम करत आहात, त्या कामासाठी योग्य अशी माणसे भेटतील. त्यामुळे पुढे जाण्यासाठी चांगली मदत मिळेल. कामाला जरी उशीर झाला तरी चिडून न जाता, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. या काळात, केलेल्या कामांचा फायदा भविष्यात नक्कीच चांगला होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळाटाळ करू नये. कुटुंब सुख चांगले मिळेल.
उपाय- वृद्ध व्यक्तीला आर्थिक मदत करावी
मिथुन
या आठवड्यामध्ये व्यवसाय किंवा नवीन नातेसंबंध यांच्याबद्दल काही नवीन माहिती मिळेल. कदाचित ही बातमी व्यवसाय विस्ताराची किंवा नवीन नातेसंबंधाची असू शकते. ही बातमी एखाद्या ‘कलेशी निगडित’ किंवा सत्य सभ्य व्यक्तीकडून मिळेल. अध्यात्माकडे कल जास्त असेल. कोणताही व्यवहार करताना सावध असावे.
उपाय- माशांना कणकेचे गोळे घालावे
कर्क
कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा असेल. पण याच वेळी वाद सुद्धा संभवतात. जुनी येणी वसूल करण्याकरता ‘कठोर शब्दांचा’ वापर टाळावा. समजलेली बातमी ही नक्की खरी आहे का, हे कळल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. प्रवास होवू शकतो. वैवाहिक जीवन ‘सर्वसाधारण’ असेल.
उपाय- पिवळ्या रंगाची काचेची गोटी जवळ ठेवावी.
सिंह
सध्या तुमची मनस्थिती ही तितकीशी चांगली नाही. एखाद्या गोष्टीची उणीव तुम्हाला जाणवते आहे. ही उणीव व्यक्ती किंवा वस्तूची असू शकते. या काळात आर्थिक बाबतीत यश मिळाले तरी तुम्ही तितकेसे खुश नसाल. वैवाहिक जीवनामध्ये ‘एकमेकावर विश्वास’ ठेवण्याची गरज आहे. संततीच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल. प्रेमीजन एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेतील.
उपाय- गरजूला अन्नदान करावे
कन्या
काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. परिवारातील वातावरण संतुलित रहावे, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. हलगर्जीपणामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. हातापायाला एखादी जखम होऊ शकते. ‘आर्थिक नियोजन’ काळजीपूर्वक करावे लागेल. प्रेमी जनांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा. वैवाहिक जीवनात तणाव असेल.
उपाय – भटक्या कुत्र्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची सोय करावी
तूळ
कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी काही ‘अनपेक्षित बदल’ घडू शकतात. तुम्ही ते नाराजीने स्वीकाराल. सहकाऱ्यांचे बोलणे मनाला लागू शकते. तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही. आर्थिक बाबतीत समाधानकारक वातावरण असेल. एखाद्याचा सल्ला फायदा देऊ शकतो.
उपाय- पाच आंब्याची पाने धार्मिक ठिकाणी ठेवून द्यावीत
वृश्चिक
वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. एखाद्या जुन्या प्रकरणामुळे त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत संमिश्र्र परिणाम दिसेल. आर्थिक आवक थोडी कमी असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही पैसे उधार देऊ नका. जामीन राहणे टाळावे. कामाच्या ठिकाणी चुका होवू देउ नका.
उपाय- कपिला गायीला चारा घालावा
धनु
या काळात नात्यांमध्ये कटुता येऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. तब्येत ठीक ठाक असेल. पैशांची आवक समाधानकारक असेल. सगळे असून सुद्धा काहीतरी उणीव आहे, असे तुम्हाला जाणवेल. वैवाहिक जीवनामध्ये काटकसरीमुळे वादावादी होऊ शकतात.
उपाय- अशोकाचे पान कुंकू लावून जवळ ठेवा
मकर
निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. तुमच्या गरजांना प्राधान्य देण्याची गरज आहे. दुसऱ्यांवरती अतिविश्वास किंवा अविश्वास दोन्ही टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात आनंद असेल. आर्थिक बाबतीत सर्वसाधारण परिणाम मिळतील आयत्या वेळी मित्राची साथ मिळाल्यामुळे फायदा होईल.
उपाय -पक्षांकरता पाण्याची सोय करावी
कुंभ
मेहनतीचा परतावा मिळेल. आरोग्याच्या समस्या असतील. या काळात एखादा नवीन प्रोजेक्ट सुऊ कराल. तुम्ही घेतलेले काही निर्णय अचूक ठरतील व त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. घरातील वातावरण चांगले असेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. पैशांच्या बाबतीमध्ये हा आठवडा उत्तम असेल.
उपाय – निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर शक्यतो टाळावा
मीन
अध्यात्माशी संबंधित व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. तुम्ही केलेल्या अर्जाचा अपेक्षित प्रतिसाद मिळेल. सरकारी कामे होतील. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. बोलताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करावा. तुमच्या स्वभावामुळे अवघड काम होऊन जाईल. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका.
उपाय – लाजाळूचे झाड घरी लावावे





