27-7-2022 ते 2-8-2022
कालसर्पाची पुंगी! वाजवतो कोण आणि वाजते कुणाची (भाग 4-सारांश)
आता दुसरा मुद्दाः राहू ज्या स्थानात आहे त्याबरोबर इतर काही ग्रह असतील आणि त्यांच्या डिग्री पाहिल्यास त्यामध्ये बरेच अंतर असेल तर मग कालसर्पयोग होईलच कसा? ज्योतिषशास्त्रात बारा भाव बारा राशी आणि बारा ग्रह यांचे परम्यूटेशन आणि कॉम्बिनेशन पाहिले जाते. ग्रहांचा परस्परांशी असलेला संबंध, भावाचे आणि राशींचे गुणधर्म यावर ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा असतो. ग्रहांच्या या एकमेकांशी असलेल्या संबंधापैकी एक संबंध म्हणजे हा सो कॉल्ड कालसर्प योग! आणि म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीला हा दोष नाही हे त्रिवार सांगितले. जर हा योग आहे असे मान्य केले तर या योगाचे काही परिणाम असायला हवेत. जसे इतर योगांचे असतात. माझ्या अभ्यासाप्रमाणे अशा योगाचा जातक कष्ट करायला मागे पुढे पाहत नाही. कित्येक कालसर्पाचे जातक हे अत्यंत धनवान असतात. त्यांची तर्कबुद्धी अप्रतिम असते. त्यांना वादविवाद करायला आवडते. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी इतर सदस्यांपेक्षा जास्त असते. कित्येक वेळेला असे जातक काल्पनिक प्रॉब्लेम्स किंवा समस्या सोडवण्यात दंग असतात. त्यांच्या आयुष्यात घटना अचानक घडतात. तरुणपण संघर्षमय असते. यांना कामवासना जास्त असते. ज्योतिषशास्त्रामध्ये जे अनेक योग बनतात त्यापैकी क्षुल्लक योग म्हणजे हा कालसर्प योग. सर्प, साप म्हटलं की अनेकांना घाबरायला होते आणि त्यात कालसर्प म्हटलं की मग विषयच संपला! ज्योतिष भाषेत सांगायचे झाले तर शुभयोग आणि अशुभयोग असे योगांचे हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी हा कालसर्पयोग शुभ आणि अशुभ दोन्हीही आहे. शुभ असा की तो मनुष्याला प्रचंड उंचीवर घेऊन जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, नेहरू अशी किती उदाहरणे द्यावी.. आणि अशुभ असा की काही वेळेला कामांमध्ये अडचणी निर्माण करतो किंवा आयुष्यात एखाद्या गोष्टीची खंत देतो. म्हणजेच आत्तापर्यंत लेखामध्ये आपण बघितले की कालसर्प नावाचा दोष नसतो. योग म्हणूनही जर आपण याबद्दल विचार केला तरी जगभरच्या विद्वान ज्योतिषांमध्ये याबद्दल मतभेद आहेत. अगदी हल्ली-हल्लीच्या प्राध्यापक के. न. राव सारख्या जगद्विख्यात ज्योतिषांनी याला नकार दिला तर त्यांचेच शिष्य असलेल्या आचार्य सागर यांनी या योगाची पाठराखण केली. आधुनिक नक्षत्र ज्योतिषाचे शिल्पकार कृष्णमूर्तीजी यांनी तर ग्रहांचे कारकत्व याला देखील नकार दिला. मग कालसर्प ही खूप लांबची गोष्ट. कोणाच्याही पत्रिकेत जर कालसर्प असा उल्लेख असेल तर जराही न घाबरून जाता त्याचे योग्य विश्लेषण करून घ्यावे. एखाद्याने तुमच्या कुंडलीमध्ये अमुक एक दोष आहे असे सांगितले की घडणाऱया प्रत्येक नकारात्मक घटनेला आपण त्या दोषाला जोडून बघतो. असे न करता सकारात्मक गोष्टींची दखल घेऊन नकारात्मक योगांचा शास्त्राsक्त विचार आणि उपचार करणे गरजेचे आहे. पुढच्या लेखात याच कालसर्प योगावर अगदी सोपे पण रामबाण उपाय सांगतो.
महाउपायः लहान मुले झोपेतून दचकून उठतात. कित्येक लोकांना झोपेत वाईट स्वप्ने पडतात आणि त्यामुळे नंतर झोप येत नाही. अशावेळी रविवारी आणि मंगळवारी झोपताना उशीखाली तुरटीचा तुकडा ठेवावा. शांत झोप लागण्यास मदत होते.
सोपी वास्तू टिपः कधीही गळका-टपकणारा नळ घरी असू नये. पाण्याच्या टपटप आवाजामुळे निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि तब्येतीवर परिणाम होतो.
मेष
येणाऱया काळामध्ये नेटवर्क वाढविण्याची गरज आहे. तब्येतीचा पाया भक्कम राहील. पैशांची देवाण-घेवाण सुव्यवस्थित होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. वाहन दुरुस्ती किंवा घरच्या कामांकरता खर्च कराल. गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरदार वर्गाला सांभाळून रहावे लागेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल. कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध रहावे. व्यावसायिकांना चांगले दिवस आहेत.
उपाय-मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे.
वृषभ
मनाप्रमाणे पैसे न मिळाल्यामुळे थोडे नाराज होऊ शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीचा त्रास होऊ शकतो. वाहन आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत अनुकूल काळ आहे. संततीच्या बाबतीत चिंता वाटू शकते. शेअर्स सारख्या धोकादायक गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. नोकरीमध्ये वरि÷ांचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय-आंब्याच्या झाडाला पाणी घालावे
मिथुन
येणारे कालावधी बदलणारे ग्रहमान हे सुचवते की तुमच्या तब्येतीला तुम्हीच जपले पाहिजे. जिथून पैशांची येणी आहेत तिथून निराशा झाल्याने राग राग होईल. अगदी छोटय़ाशा कारणावरून घरात वाद होऊ शकतो. प्रवासाने ताजेतवाने व्हाल. प्रेमींना नात्यात निराशा जाणवेल. नोकरदारांना उत्तम ग्रहमान आहे. सोबत काम करणाऱयांचे सहकार्य मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल.
उपाय- मुंग्यांना साखर घालावी.
कर्क
पाठीचे किंवा सांध्यांचे दुखणे त्रास देऊ शकते. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. धन आगम उत्तम असेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रवास मात्र टाळावा. लहान भाऊ किंवा शेजारी यांच्याशी मतभेद होऊ शकतात. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावे. प्रेमींना उत्तम काळ आहे. इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. एखादा सहकर्मी तुमची तक्रार करू शकतो.
उपाय- जांभळय़ा रंगाचे कापड दान द्यावे.
सिंह
आरोग्य सुधारावे याकरता प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. पैशांच्याबाबतीत सांभाळून राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीशी वाद संभवतो. प्रवासातून नुकसान होईल. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. मातृसुख लाभेल. प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठचा सपोर्ट मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी असलेला वाद मिटेल.
उपाय– दिव्यांगांना मिठाई वाटावी.
कन्या
तुमच्याविरुद्ध कोणी कट-कारस्थान करत नाही ना याची खात्री करून घ्या. तब्येतीच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी असतील. पैशांच्याबाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. नातेवाईकांचे आगमन होईल. प्रवासातून फायदा होईल. प्रवास टाळावा. जमिनीचे व्यवहार करू नका. प्रेमसंबंध घट्ट होतील. नोकरदार वर्गाला समाधानकारक यश मिळेल. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय– देवीला कुंकूमार्चन करावे.
तूळ
कमरेचे दुखणे किंवा हाडांचे दुखणे त्रास देऊ शकते. पोट बिघडणे किंवा ऍसिडिटी यापासून सावध रहावे. पैशांच्याबाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. लहान भाऊ किंवा बहीण यांच्याशी वाद संभवतो. प्रेमसंबंधात मधुरता येईल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवन सुंदर असेल. वाहन जपून चालवावे. कामाच्या ठिकाणी वाद टाळावा.
उपाय– महिलेला सौभाग्यालंकार भेट द्यावे.
वृश्चिक
तब्येत सुधारल्याने मन आनंदी असेल. कामात लक्ष लागेल. उत्साह वाढेल. पैशांच्या बाबतीत मात्र थोडे सावध राहणे गरजेचे आहे. काही येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. धनसंचय करण्याकरता कष्ट होतील कुटुंबात वादाचे प्रसंग येऊ नये यासाठी प्रयत्न करा. प्रवास घडण्याचे योग आहेत. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. प्रेमींना अनुकूल काळ आहे. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे योग आहेत.
उपाय- श्री गणेश दर्शन घ्यावे.
धनु
सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तणावाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. पैसे वेळेवर मिळाल्याने खुश व्हाल. नवीन ओळखी होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमसंबंधात मधुर क्षण येतील. इन्व्हेस्टमेंटमधून चांगला फायदा होईल. नोकरदार वर्गाला अनुकूल वेळ आहे. कामाच्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढेल.
उपाय- हळदीचा टिळा लावावा.
मकर
उत्साहवर्धक काळ असेल. कामात लक्ष लागेल. एखाद्या मित्राबरोबर वाद संभवतो पण तो तात्पुरता असेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रवास घडण्याचे योग आहेत. वाहनसुख उत्तम मिळेल. प्रेमींनी जबाबदारीची जाणीव ठेवावी. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला मात्र सावध राहण्याची गरज आहे, एखादी चूक महागात पडू शकते. वैवाहिक जीवनात ताण तणाव असेल.
उपाय- काजळाची डबी जवळ ठेवावी.
कुंभ
कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदाने वेळ घालवाल. कामात उतावळेपणा करून चालणार नाही, चूक होऊ शकते. तब्येत उत्तम असेल. मागे घडलेला त्रास कमी होईल. प्रवासातून फायदा आणि नवीन ओळखी होतील. भावंडांची साथ मिळेल. लिखाणात यश मिळेल. प्रेमसंबंधात तणाव येऊन तुटू शकतात. शेअर्सच्या गुंतवणुकीमध्ये पैसे अडकू शकतात. नोकरीत सावध असावे.
उपाय– आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घाला.
मीन
छोटय़ा-मोठय़ा तक्रारी सोडल्या तर तब्येत ठीकठाक असेल. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. भावंडांकडून सहयोग प्राप्त होईल. आईशी मतभेद संभवतात. प्रेमसंबंधांमध्ये वादावादी होऊ शकते. इन्व्हेस्टमेंट जपून करावी. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी समजुतीने वागण्याचा प्रयत्न करा. भाग्य साथ देईल.
उपाय- माशांना कणकेचे गोळे घाला.





