कोल्हापूर :
रंकाळा तलावात सोमवार सकाळी एक दुर्मिळ आणि वयोवृद्ध कासव मृत अवस्थेत आढळून आले. अंदाजे 80 वर्षांहून अधिक त्याचे वय होते. कासव भारतीय सॉफ्टशेल कासव किंवा गंगा सॉफ्टशेल कासव म्हणून ओळखले जाते. आहे ही प्रजाती प्रामुख्याने गंगा, सिंधू आणि महानदीसारख्या नद्यांमध्ये आढळते.
कासव दुर्मिळ ‘असुरक्षित‘ प्रकारात गणले जाते. यांची लांबी साधारणत: 94 सेंमी (37 इंच) पर्यंत असते. हे कासव मांसाहारी असून मुख्यत्वे मासे, उभयचर प्राणी, मृत प्राणी (कॅरियन) आणि इतर जलचर प्राणी खातात, पण काही वेळा जलचर वनस्पतीही खातात. हे कासव भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची 1 च्या भाग 2 मध्ये सूचीबद्ध आहे. त्यामुळे या प्रजातीचा ताबा घेणे किंवा नुकसान करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
- रक्तस्त्रावासह मृतावस्थेत सापडले
आज सकाळी रंकाळा तलावाच्या काठी फिरण्राया नागरिकांच्या नजरेस हे कासव पडले. त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचेही दिसून आले. त्वरित प्रशासनाला कळवण्यात आले.
- मृत्यूचे कारण अस्पष्ट
कासवाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तलावातील वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा साठा, मानवी हस्तक्षेप आणि जलपर्यटन यामुळे असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींसह अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- रंकाळा तलावाच्या रक्षणाचा गंभीर सवाल
रंकाळा तलाव कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, वाढते प्रदूषण, बोटींग, प्लास्टिकचा साठा आणि अतिक्रमण यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या दुर्मिळ कासवाच्या मृत्यूने पुन्हा एकदा तलावाच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
- ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर
ही प्रजाती लुप्त होण्याची मार्गावर आहे. या कासवाची पहिल्यांदा नोंद पुण्यात झाली होती आपल्या भागात तळे, नदी, आदी मध्ये ही प्रजाती आढळते. वन्यजीव कायद्यानूसार ही प्रजात शेड्यूल 4 मध्ये आढळते. रंकाळ्यामध्ये असणाऱ्या जीवसृष्टीची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या इकडच्या जैवविविधतेची रक्षण करणे ही आपली गरज आहे.
डॉ. सुनिल गायकवाड, जैवविविधता अभ्यासक, कोल्हापूर








