वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुर्लभ खनिजांप्रकरणी आत्मनिर्भर होण्याकरता आता आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये देखील लवकरच याकरता खनन सुरू केले जाणार आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) या दोन्ही राज्यांमध्ये दुर्लभ खनिजांच्या साठ्याचा शोध लावला आहे. सीएसआयकडून ईशान्य भारताच्या भूवैज्ञानिक क्षमतेवर जारी नव्या अध्ययन अहवालात आसामच्या कार्बी ग्लांग जिल्ह्याच्या जशोरा आणि सामपंची परिसरांमध्ये दुर्लभ खनिजांच्या साठ्यांचा शोध लागल्याचा म्हटले गेले आहे. संबंधित ठिकाणी नियोबियम आणि इट्रियम यासारखे सहाय्यक घटक देखील अस्तित्वात आहेत.
या खननासंबंधी आसाम सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव अजय तिवारी यांनी अॅसोचॅमकडून कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमाद्वारे माहिती दिली आहे. दोन पर्वतीय जिल्हे दिमा हसाओ आणि कार्बी आंगलांगमध्ये महत्त्वपूर्ण खनिजांच्या साठ्याची माहिती मिळाली आहे.
जीएसआयच्या अहवालात काय?
जीएसआयच्या अहवालानुसार संबंधित ठिकाणी दुर्लभ खनिजांचा साठा आहे. याविषयी अंतिम अहवाल मिळताच खाणींच्या वाटपासाठी लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याकरता मंजुरीच्या प्रक्रियेला गतिमान केले जात असून शासकीय संस्थांसोबत खासगी कंपन्यांसोबत प्रारंभिक चर्चा सुरू आहे. सरकार खाण उद्योगावर आता विशेष लक्ष देत असल्याचे अतिरिक्त सचिवांनी सांगितले आहे.
पुरुलिया येथेही साठे
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातही दुर्लभ खनिज घटकांच्या साठ्यांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आसामसोबत येथेही याचा साठा असण्याची शक्यता आहे. अध्ययन पूर्ण झाल्यावर याचा अहवाल केंद्र सरकारला सोपविण्यात येणार आहे. हा जी-2 स्तराचा शोध असून यात खनिजांच्या नमुन्यांचे विश्लेषण करत त्याची गुणवत्ता आणि तेथील प्रमाणाचे मूल्यांकन केले जाते अशी माहिती जीएसआयचे संचालक असित साहा यांनी दिली.
दुर्लभ खनिजांचे महत्त्व
सद्यकाळात दुर्लभ खनिजांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच्या खनन अन् शोधाप्रकरण चीन पूर्ण जगात पहिल्या स्थानावर आहे. भारत देखील स्वत:च्या गरजेसाठी तेथूनच आयात करतो. परंतु चीनकडून याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने पुरवठासाखळी प्रभावित झाली आहे. याचमुळे भारत सरकारने या दुर्लभ खनिजांच्या साठ्यांचा शोध आणि त्याच्या खननाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. दुर्लभ खनिजांचा वापर स्मार्टफोनपासून अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसोबत वीजेचे मीटर, बॅटरी, क्षेपणास्त्र आणि रडार प्रणाली, सौर ऊर्जा पॅनेल्स आणि वैद्यकीय उपकरणांसह अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. पवनचक्की आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्येही याचा वापर होतो.
एक विश्लेषणात्मक समूह केयर एजच्या अहवालानुसार जगातील दुर्लभ खनिजांचा 8 टक्के साठा भारतात आहे, परंतु याच्या जागतिक खननात भारताचा हिस्सा केवळ एक टक्केच आहे. अशास्थितीत या साधनसंपदीच्या दोहनातून भारताच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळू शकते. खनिज क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने चालू वर्षात नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन सुरू केली आहे. ओडिशासह केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये या खनिजांचे साठे असल्याचे जीएसआयचे मानणे आहे. आता पश्चिम बंगाल आणि आसाम देखील या यादीत सामील होणार आहे.
रेयर अर्थ मटेरियल्स
रेयर अर्थ मटेरियल्स हा 17 रासायनिक घटकांचा समूह आहे. हा पृथ्वीच्या खूप खोलवरील थरावत आढळून येतो. परंतु याचे खनन आणि शोध अत्यंत महाग ठरते. याकरता प्रगत तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. याचमुळे जगातील अनेक देशांमध्ये याचे साठे असूनही तेथे खनन अन् शोध कार्य होत नाही.









