तासगाव :
तालुक्यातील तुरची येथे वैशिष्ट्यपूर्ण असा दुर्मिळ फॅन थ्रोटेड लीजार्ड म्हणजेच रंगीत गळ्याचा सरडा आढळून आला. तुरची येथील भारती हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या धोंडोळी माळ परिसरातील पर्यावरण अभ्यासक महेश मदने यांच्या रानामध्ये या सरड्याचे दर्शन झाले.
आकाराने पाली पेक्षाही लहान मातकट तपकिरी रंगाचा वैशिष्ट्यपूर्ण रंगीत गळा व त्यावरती असणारी रंगीबेरंगी मोरपंखी निळ्या काळ्या केसरी रंगाची पंख्यासारखी पिशवी लक्ष वेधून घेते. भारतीय उपखंडात आढळणारा हा सरडा पश्चिम महाराष्ट्रात ही बऱ्याच वेळा दर्शन देऊन जातो
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक ठेवणीमुळे आपले वेगळेपण सिद्ध करतो. विनीच्या हंगामामध्ये मादीला आकर्षित करण्यासाठी तसेच संकटामध्ये बचावासाठी आपल्या गळ्याला असणारी पंख्याच्या आकाराची रंगीत पिशवी फुगवतो. त्यामुळेच याला रंगीत गळ्याचा सरडा हे नाव पडले असावे. गवताळ माळराणे, डोंगर टेकड्या, दगड गोट्यांचा परिसर हा त्याचा आवडता रहिवास. मुंगी, वाळवीसारखी कीटक गवताच्या बिया हे त्याचे प्रमुख अन्न आहे. प्रत्येक पायाला चारच बोटे. पुढील पाया पेक्षा मागील पाय लांब आणि मजबूत असल्याने मागच्या दोन पायावरती उभा राहून टेहळणी करताना आढळतो.
असा हा जीवसृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण जीव आढळल्याने विविधतेने नटलेल्या जीवसृष्टीचे सुंदर दर्शन घडत आहे. खरं म्हणजे आपल्याला एक प्रचलित म्हण माहिती आहे. सरड्यासारखे रंग बदलणे, रंग बदलणारा सरपटणारा प्राणी म्हणून सरडा प्रसिद्ध आहे. परंतु सरडा हा स्वसंरक्षणासाठी रंग बदलतो परंतु माणूस हा स्वतःच्या हव्यासासाठी फायद्यासाठी वेळोवेळी रंग बदलतो. या सुंदर क्षणाचे चित्रीकरण करण्यात पर्यावरण अभ्यासक महेश मदने यांना यश आले.








