प्रतापगड :
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली गावात नुकताच आढळलेला एक दुर्मीळ अल्बिनो ‘पहाडी तरकर’ (Montane Trinket) साप अॅनिमल रेरक्यू टीमच्या तातडीच्या प्रतिसादामुळे सुरक्षितरित्या पकडला असून, नंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले.
ही घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. गावातील एका घरामध्ये सुमारे ३ फूट लांबीचा पांढऱ्या रंगाचा साप दिसून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. तत्काळ माहिती मिळताच ‘अॅनिमल रेस्क्यू टीम, पाचगणी’च्या सदस्य संस्कृती बोंगाळे घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी संपूर्ण दक्षतेने सापाला पकडले.
- दुर्मीळ अल्बिनो सापाचे वैशिष्ट्येः
हा ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ साप रंगद्रव्य (Melanin) नसल्यामुळे त्वचेला पांढरा व डोळ्यांना लालसर रंग असतो. या अत्यंत दुर्मीळ अवस्थेमुळे ते नैसर्गिक अधिवासात फार काळ टिकू शकत नाहीत, कारण त्यांचे संरक्षणात्मक रंग हरवलेले असते. त्यामुळे त्यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे ठरते.
- रेस्क्यू मोहिमेचे कौतुकः
या यशस्वी मोहिमेबद्दल अॅनिमल रेस्क्यू टीम पाचगणीचे अध्यक्ष राजीव बोरा म्हणाले, अशा दुर्मीळ सापांची सुटका करणे हे कौशल्य, संयम आणि धैर्याचे कार्य आहे. संस्कृती बोंगाळे आणि त्यांच्या टीमने जलद व योग्य प्रतिसाद दिल्याने सापाला सुरक्षितपणे जंगलात पाठवता आले.
संस्कृती बोंगाळे आणि अॅनिमल रेस्क्यू टीम, पाचगणी यांनी दाखवलेली तत्परता आणि निसर्गाविषयीची जाणीव ही संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर अशा कृती अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यासाठी या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- वनविभागाचा समन्वय आणि पर्यावरणप्रेमींचे समाधानः
सापाला पकडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर ठरावीक प्रक्रियेनंतर सापाला त्याच्या जैविक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले. ही घटना पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान आणि आनंदाची लाट पसरवणारी ठरली आहे.








