अण्णामलाई विद्यापीठ बलात्कार प्रकरणी निर्णय
► वृत्तसंस्था / चेन्नई
काही काळापूर्वी तामिळनाडू राज्यातील अण्णामलाई विद्यापीठात एका महिलेवर बलात्कार केलेला आरोपी ज्ञानशेखर याला तामिळनाडूतील महिला न्यायालयाने 30 वर्षांच्या आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षाकाळात आरोपीला कोणत्याही परिस्थितीत कारागृहातून बाहेर पडता येणार नाही, असेही निर्णयपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात आरोपी ज्ञानशेखर याच्या विरोधातील सुनावणी पूर्ण करुन निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता.
भारतीय न्यायसंहितेच्या अनुच्छेद 64 (1) आणि इतर अनुच्छेदांच्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा सादर करण्यात आला होता. त्याचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. सोमवारी त्याला शिक्षा सुनावण्यात आली. आजन्म कारावासाच्या शिक्षेसह त्याला 25 हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी तीन महिन्यांची साधी शिक्षा होणार आहे.
वेगवेगळी शिक्षा
ज्ञानशेखर याच्यावर विविध अनुच्छेदांच्या अंतर्गत गुन्हे सादर करण्यात आले होते. या प्रत्येक अनुच्छेदांच्या अंतर्गत त्याला वेगवेगळी शिक्षा देण्यात आली. ती एक महिना कारावासापासून 10 वर्षांच्या कारावासापर्यंतची आहे. त्याच्यावर असणाऱ्या बलात्काराच्या मुख्य आरोपासाठी त्याला 30 वर्षांच्या कारागृहाची शिक्षा देण्यात आली आहे. सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत.
विशेष तपास दलाची स्थापना
मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास दलाची स्थापना केली होती. ज्ञानशेखर याचे तामिळनाडूतील राजकीय सत्ताधाऱ्यांशी संबंध होते, असा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तपास दलाने या संबंधी पूर्ण चौकशी करुन तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर केला. या प्रकरणाची सुनावणी वेगवान पद्धतीने महिला न्यायालयात करण्यात आली. पाच महिन्यांमध्ये या प्रकरणात निर्णय देण्यात आला आहे.
प्रकरण काय होते…
23 डिसेंबर 2024 या दिवशी आरोपी ज्ञानशेखर याने चेन्नई येथील अण्णामलाई विद्यापीठाच्या परिसरात शिरुन एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. ज्ञानशेखर याचे या विद्यापीठाच्या बाहेर बिर्याणी विक्रीचे केंद्र होते. घटना घडली त्या रात्री ही विद्यार्थिनी आपल्या एका मैत्रिणीसह फिरायला बाहेर पडली होती. यावेळी ज्ञानशेखरने विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश मिळविला आणि या विद्यार्थिनीला जबरदस्तीने एका निर्मनुष्य स्थानी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. त्याने हा प्रसंग आपल्या मोबाईलवर चित्रित केला. सदर विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीवरुन नंतर त्याला अटक करण्यात आली होती. आरोपीवर एकंदर 11 गुन्हे सादर करण्यात आले होते. त्या सर्व गुन्ह्यांमध्ये त्याला दोषी धरण्यात आले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद चेन्नई आणि संपूर्ण तामिळनाडू राज्यात उमटले होते. विद्यापीठांमधील महिला सुरक्षेचा प्रश्नही त्यामुळे प्रकाशात आला होता. या प्रकरणाचे राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले होते.









