जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, वाढत्या कडक उन्हाचा परिणाम: दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे शहरवासियांचा संघर्ष
बेळगाव : दिवसेंदिवस कडक उन्हामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. शहरातील तलाव, कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. एलअँडटी कंपनीने हिडकल आणि राकसकोप जलाशयाची पाणी पातळी स्थिर असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. शहरातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र बनला आहे. शहराबरोबर उपनगरातील अनगोळ, वडगाव, कणबर्गी, बसवण कुडची परिसरातील तलावांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्याने उपनगरातील शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. मे अखेरपर्यंत पाणी पातळीत पुन्हा घट होणार असून समस्या भेडसावणार आहे.
शहरातील सर्वच कूपनलिका आणि विहिरींच्या पाणी पातळी खाली जाऊ लागली आहे. तर काही ठिकाणी विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाबरोबर पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे पाणी समस्या जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली आहे. पारा 38 ते 39 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे उष्म्याने नागरिकांची लाहीलाही होत आहे. मार्च अखेरीस वळिवाचा पाऊस बसरला होता. त्यानंतर वळिवानेही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली आहे. दरवर्षी उन्हाळा आला की उपनगरातील तलाव आणि विहिरींच्या पाणी पातळीत घट होते. आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. सध्या काही भागात चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासियांना संघर्ष करावा लागत आहे. सार्वजनिक विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांचे पाणी तळाला गेले आहे.
ग्रामीण भागातही पाणी समस्या
ग्रामीण भागातील तलाव, जलाशय, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही गावांमध्ये सकाळपासूनच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नैसर्गिक जलस्रोते नादुरुस्त झाल्याने पाणी मिळणे अशक्य झाले आहे. बहुतांशी तलाव कोरडे पडल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे वळिवाकडे नजरा लागल्या आहेत.









