शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलद कृती दलाची एक तुकडी बेळगावात दाखल झाली असून या तुकडीतील जवान व पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. मंगळवारी हे पथसंचलन झाले. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे. पोलीस स्थानकनिहाय गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. जलद कृती दलालाही पाचारण करण्यात आले असून मंगळवार दि. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन करण्यात आले.
जलद कृती दलाचे अधिकारी व जवान, स्थानिक पोलीस या पथसंचलनात सहभागी झाले होते. राणी चन्नम्मा चौकापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, खडेबाजार, जालगार गल्ली, खडक गल्लीमार्गे हे पथसंचलन मार्केट पोलीस स्थानकात पोहोचले. तेथे समारोप करण्यात आला. उत्सवाच्या काळात कोणत्याही अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील, त्याला धक्का पोहोचेल, अशी कृती कोणीही करू नये. शांततेने व उत्साहाने उत्सव साजरा करावा. पोलीस दलाच्यावतीने ठरवून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.









