बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आकाश उर्फ अक्षय महादेव साळुंखे (वय 32), रा. बुद्धनगर ता. निपाणी असे त्याचे नाव असून सोमवार दि. 8 रोजी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे.
आरोपी आकाश याने निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर उसाच्या फडात नेऊन अत्याचार केला होता. त्यामुळे याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केल्याने 2019 मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात तत्कालीन तपास अधिकारी एस. डी. सत्यनायक यांनी दोषारोप दाखल केल्याने जिल्हा पोक्सो न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती.
सरकारी पक्षातर्फे 6 साक्षी, 32 कागदोपत्री पुरावे आणि 9 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यावेळी आकाशवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी त्याला 30 वर्षांची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकारणाकडून 4 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचा आदेशही बजावण्यात आला. सरकारी पक्षातर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









