बेळगाव : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवार दि. 22 रोजी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून यल्लालिंग उर्फ यल्लाप्पा रामाप्पा क्वॉनी (वय 29) रा. ससालट्टी, ता. जमखंडी, जि. बागलकोट असे त्याचे नाव आहे. आरोपी यल्लाप्पाने हारुगेरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी सलगी केली होती. वारंवार तिच्याशी त्याने बोलणे ठेवले होते. तुझ्यावर मी प्रेम करतो, माझ्याशी लग्न कर, तुला मी सुखात ठेवीन, असे म्हणत मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 18 एप्रिल 2017 रोजी पुन्हा लग्नाच्या आमिषाने नातेवाईकांच्या शेतातील घरात नेऊन दोनवेळा अत्याचार केला.
इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलीला त्याने धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे या प्रकरणी हारुगेरी पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपास अधिकारी सुरेश शिंगी यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने खटल्याची पोक्सो न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयात एकूण 20 साक्षी, 40 कागदोपत्र पुरावे आणि 10 मुद्देमाल तपासण्यात आले. यावेळी आरोपीवर गुन्हा शाबीत झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. तसेच जिल्हा कायदा प्राधिकारणाकडून पीडितेला 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही बजावला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









