अल्पवयीनासह तिघे ताब्यात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत होळी-धूलिवंदनच्या दिवशी जपानी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तीन मुलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांपैकी एक मुलगा अल्पवयीन आहे. आरोपींनी आपली चूक कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जपानी तऊणीला रंग लावताना तिच्यासोबत अयोग्य घटना घडल्याचा प्रकार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उघड झाला होता. ही घटना घडल्यानंतर तपास यंत्रणांनी जपानी दुतावासाला पत्र लिहून मुलीची ओळख पटवण्यासाठी मदत मागितली होती. परंतु दुतावासाने आपल्याला अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचे कळवले होते. तरीही व्हायरल झालेला व्हिडिओ तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे उपपोलीस आयुक्त संजय कुमार सैन यांनी सांगितले. दरम्यान, पहाडगंज येथे राहणारी जपानी तरुणी भारत सोडून बांगलादेशात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जपानी तरुणी होळी खेळण्यासाठी जपानहून भारतात आली होती. या घटनेचा व्हिडिओ मुलीने स्वत: शेअर केला होता, मात्र नंतर तो अकाऊंटवरून काढून टाकण्यात आला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओमध्ये मुलांचा एक गट जपानी मुलीसोबत जबरदस्तीने होळी खेळताना दिसत होता. तरुणी निघून जात असताना एका व्यक्तीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत मुलीने त्याला थप्पडही मारली. यादरम्यान शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी उपस्थित केला आहे.









