तिहार तुरुंग अधिकाऱयाने दिली माहिती ः नव्हता फीजिओथेरपिस्ट ः पॉक्सो ऍक्टमध्ये झाली होती अटक
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तुरुंगात कैदेत असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज करणारा व्यक्ती बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. तुरुंगातील मसाजचा व्हिडिओ समोर आल्यावर भाजपने आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना फीजियोथेरपी देण्यात येत असल्याचा युक्तिवाद केजरीवालांनी आरोपांप्रकरणी केला होता.
जैन यांना मसाज देणारा व्यक्ती पॉक्सो ऍक्टमध्ये कैद आहे. त्याला एक वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. हा आरोपी फीजियोथेरपिस्ट नसल्याचे तिहार तुरुंगाच्या अधिकाऱयाचा दाखला देत वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. सत्येंद्र जैद यांना मसाज देणारा बलात्कार होता, केजरीवालांनी याप्रकरणी सत्येंद्र जैन यांचा बचाव का केला याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे. तीन दिवसांपूर्वी पूनावाल यांनीच जैन यांच्या तुरुंगातील मसाजचा व्हिडिओ शेअर केले होते.
जैन यांच्या वकिलाचा आरोप
दिल्लीच्या एका न्यायालयात जैन यांच्याकडून उपस्थित वकील राहुल मेहरा यांनी ईडीवर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही ईडी प्रसारमाध्यमांना संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर ईडीचे वकील जोहैब हुसैन यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
आपकडून भाजपवर प्रतिआरोप
जैन यांचा मसाज घेतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सत्येंद्र जैन यांची बाजू घेणारी भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली होती. जैन आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फीजियोथेरपी घेत आहेत. तिहार तुरुंगातून व्हिडिओ लीक कसे झाले याची चौकशी करण्यात यावी. जैन यांच्या आजाराची थट्टा उडविण्याचा प्रकार लाजिरवाणा असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले होते.

थेरपीचा अनादर नको
सिसोदिया यांच्या वक्तव्याचा इंडियन असोसिएशन ऑफ फीजियोथेरपिस्टने विरोध केला होता. व्हिडिओत दिसून येत असलेला मसाज म्हणजे फीजियोथेरीप नाही. देशभ्घ्रात अनेक फीजियोथेरपिस्ट तुरुंगातील कैद्यांना सेवा देत आहेत. परंतु आम आदमी पक्षाने मांडलेली भूमिका या थेरपीला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचे या संघटनेने म्हटले होते.
तुरुंग् अधिकाऱयांवर कारवाई
सत्येंद्र जैन यांना तुरुगांत व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तिहार तुरुंगाचे अधिकारी अजित कुमार यांना 14 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. तर त्यापूर्वी तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांना हटवून त्यांच्या जागी संजय बेनीवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. गोयल यांच्यावर तुरुंगात कैद सुकेश चंद्रशेखरकडून 10 कोटीची रक्कम उकळल्याचा आरोप आहे.









