चंदीगड :
पंजाबमध्ये बलात्कार प्रकरणी 2 सप्टेंबरपासून फरार असलेला आम आदमी पक्षाचा आमदार हरमीत सिंह पठानमाजारा यांची व्हिडिओ मुलाखत समोर आली आहे. पठानमाजरा हा ऑस्ट्रेलियात पसार झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पंजाब पोलिसांची कोंडी झाली आहे, कारण सनौरचे आमदार असलेल्या पठानमाजराला अटक करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. पतियाळा पोलिसांनी आता आप आमदाराच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे. पठानमाजरा हा ऑस्ट्रेलियातील पंजाबी वेब चॅनेलसोबत व्हिडिओत मुलाखतीत दिसुन आला आहे. यात जामीन प्राप्त केल्यावरच घरी परतणार असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच स्वत:वरील आरोप नाकारत पठानमाजराने हे प्रकरण राजकीय कटाचा असल्याचा दावा केला आहे. पंजाबमध्ये महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये मंत्री आणि आमदारांशी सल्लामसलत केली जात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश आणला जात आहे. दिल्लीत पक्षाचा पराभव झाल्यावर आता तेथील नेत्यांनी पंजाबमध्ये कब्जा केला असून ते दिल्लीप्रमाणेच येथील पक्षाला उदध्वस्त करत असल्याचा आरोप करत पठानमाजराने अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.
फरार घोषित करण्याची कार्यवाही
पतियाळा येथील एका न्यायालयाने बलात्कार प्रकरणी हजर न राहिल्यावर पठानमाजरा विरोधात फरार घोषित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी पठानमाजरा विरोधात जीरकपूर येथील एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपांचा गुन्हा नोंदविला आहे. आमदाराने स्वत:ला घटस्फोटित असल्याचे सांगत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, तर 2021 मध्ये माझ्यासोबत विवाह केला होता, प्रत्यक्षात तो पूर्वीपासून विवाहित होता, आमदाराने सातत्याने लैंगिक शोषण केले, धमक्या दिल्या आणि अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप महिलेने केला आहे.









