मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे गुढी पाडव्याच्याच दिवशी मनसेच्या सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले. मशिद, भोंगा, हनुमान चालीसा, मंदीर याभोवती पुन्हा एकदा राज्यातील राजकारण फिरू लागले आणि पाडव्याच्या निमित्ताने राजकीय आडवा आडवी सुरू झाली असून शिवसेना, भाजप आणि मनसेत हिंदुत्वाच्या मुद्यावरुन कोणाची गुढी मोठी, ही सुरू झालेली स्पर्धा पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. काल कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई तसेच इतर महापालिका निवडणुकांचेही रणशिंग फुंकले.
महाराष्ट्रातील राजकारण कधी नव्हे ते इतक्या खालच्या पातळीवर गेले असून महाविकास आघाडी सरकार विरूध्द भाजप हा संघर्ष हा गेल्या अडीच वर्षापासून सुरूच आहे. शिवसेनेने भाजपशी फारकत घेत 2019 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी पाट लावताना केलेल्या सत्ता स्थापनेचे शल्य अद्यापही भाजपला असून, याच संघर्षातून रोज नवीन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिवसेनेच्या डझनभर नेत्यांच्या चौकशा तर राष्ट्रवादीचे दोन मंत्री सध्या तुरूंगात आहेत, मात्र गेल्या काही दिवसातील घटना पाहता राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात प्रमुख भूमिका निभावणाऱया शिर्षस्थ नेत्यांच्या भोवती आता केंद्रीय यंत्रणांनी आपला फास आवळला असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर आणि शिवसेना नेते तसेच खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केलीय. तर दुसरीकडे कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱयांनी केलेला हल्ला पाहता आता ही लढाई शिर्षस्थ नेत्यांच्या घरापर्यंत येऊन पोहचली आहे. ज्यांनी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार करण्यात प्रमुख भूमिका निभावली होती आणि भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवले होते.
एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक ही त्या ठिकाणच्या स्थानिक मुद्यावर किंवा विकासाच्या मुद्यावर लढविली जाते, मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाचा गजर केला. या निवडणुकीच्या निमित्ताने विलेपार्ले येथील 1989 साली झालेल्या पोटनिवडणुकीची आठवण झाली, जी शिवसेनेने पहिल्यांदा देशाला हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येते हे दाखवून दिले होते. शिवसेना आणि भाजपने फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपात खर हिंदुत्व कोणाचे? यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू असून आगामी सर्व निवडणूका या शिवसेना विरूध्द भाजप यांच्यात विकासाच्या कमी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरुन जास्त लढवल्या जाणार हे भाषणाच्या निमित्ताने जवळपास सिध्द झाले. शिवसेनेला वेळोवेळी बाळासाहेबांचा विसर पडल्याचे सांगताना भाजपने त्यांच्या Eिहदुत्वाच्या भूमिकेवरुन टीका केली तर उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी हयातभर कायम ज्यांचा विरोध केला त्या पक्षासोबत जाऊन केवळ सत्तेसाठी हातमिळवणी केली असा आरोप वारंवार केला जात आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे नकली असून याच भाजपच्या लोकांना एवढा बाळासाहेबांबद्दल आदर होता मग या लोकांनी त्यांच्या नावासमोर जनाब लावायचा नीच प्रयत्न का केला ? अमित शहांनी बंद खोलीत दिलेले आश्वासन का नाही पाळले असे आरोप उध्दव ठाकरे यांनी भाजपवर करताना भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडला. कालच्या प्रचार सभांमधून एक दिसले की निवडणूक ‘कोल्हापूर उत्तर’ची होती मात्र रणशिंग मुंबई महापालिकेचे या प्रचार सभांच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फुंकले. 2019 ची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरची ही तिसरी विधानसभा पोटनिवडणूक पण यापूर्वीच्या दोन निवडणूका या तेथील स्थानिक आणि विकासाच्या मुद्यावर लढवली गेली. त्यातील पंढरपूर पोटनिवडणुकीत परीवर्तन झाले आणि राष्ट्रवादीकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे असलेली जागा भाजपकडे जाऊन तेथे समाधान अवताडे निवडून आले व भाजपचे संख्याबळ 105 वरुन 106 झाले तर नांदेड देगलूर येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापुरकर विजयी झाले. आता तिसरी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक होत आहे, ज्या तीन जागांसाठी दुर्देवाने ही पोटनिवडणूक होत आहे, तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते. मग आत्ताच कोल्हापूरच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा का केंद्रस्थानी तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश आणि शिवसेनेने धर्म निरपेक्ष पक्षांशी सत्तेसाठी केलेली हातमिळवणी यावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुनच आगामी मुंबई तसेच इतर महापालिकांच्या निवडणुका लढविल्या जाणार हे कालच्या सभेतल्या भाषणावरुन निश्चित झाले आहे. आगामी काळात शिवसेनेच्या हिंदुत्वावरुन भाजप आणि मनसे जोरदार लक्ष्य करणार यात शंका नाही तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राहुन सगळ्यात सेफ भूमिका घेऊन सत्ता भोगत असलेला आणि नावाला राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस हिंदुत्वाबाबत नेहमीच सावध भूमिका घेताना दिसतो तर राष्ट्रवादीही हिंदुत्वाच्या मुद्यावर जरा हातचं राखूनच भूमिका घेतो. त्यामुळे आता गोची होणार आहे ती शिवसेनेची. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजप व मनसेचा दोघांचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. भाजपने हिंदुत्व हा भाजपचा श्वास असल्याचे म्हटले त्यावरुन निमित्त ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा पोटनिवडणुकीचे असले तरी रणशिंग मुंबई महापालिकेचे फुंकले.
राज यांच्या आजच्या सभेकडे लक्ष
बाळासाहेबांच्या नावावर शिवसेना करोडो रुपये गोळा करत आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असल्याचा आरोप राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने राज हे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला. शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यातील भोंगा हा भाजपचाच असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आणि त्यांची मालमत्ता जप्त झाली. राज यांच्यावर या सभेनंतर भाजप सोडून सगळ्यांनी जोरदार आरोप करताना राज यांच्या राजकीय भूमिकेबाबत शंका उपस्थित केली. मनसे पक्ष संपलापासून अमित ठाकरे यांना आधी हनुमान चालिसा पाठ करायला लावा इथपर्यंत कधी नव्हे ती राज यांच्यावर सोशल मीडीयातूनही टीका झाली, त्यामुळे राज ठाकरे ठाण्यात या सर्व टीकाकारांच्या प्रश्नांना आज त्यांच्या सभेतून काय उत्तर देणार आणि कोणा कोणाची उत्तर पुजा आजच्या सभेत करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे








